Mumbai dadar railway station News : मुंबईतील दादर रेल्वेस्थाकात रविवारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली होती. एका ट्रॅव्हल ट्रॉली बॅगेत एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती. आरोपी हे तुतारी एक्सप्रेसने मृतदेह कोकणात घेऊन जाऊन त्याची विल्हेवाट लावणार होते. दरम्यान, पोलिसांच्या सतर्कतेमुळे आरोपींचा प्लॅन फासला. पोलिसांनी या प्रकरणी .जय चावडा आणि शिवजीत सिंग या दोन मुकबधिर आरोपींना अटक केली. या दोघांनी मिळून त्यांचा मित्र अर्शद अली सादीक अली शेख याची हत्या केली असल्याचं कबूल केलं असून, खून का केला याचे कारण देखील त्यांनी सांगितलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार, अर्शद अली सादीक शेख, जय चावडा व शिवजीत सिंह हे तिघेही मूकबधिर असून ते एकमेकांचे मित्र होते. रविवारी संध्याकाळी दारु पीत असताना शिवजीत सिंह व अर्शद अली सादीक शेख यांचा बायको या प्रकरणावरून मोठा वाद झाला. यावेळी रागाच्या भरात शिवजीतने अर्शद अली सादीक शेखचा हातोडा डोक्यात घालून त्याचा खून केला.
आरोपी हे सांताक्रुझ परिसरात राहतात. हत्या झालेला अर्शद विवाहित असून त्याला दोन मुले आहेत तो देखील मूकबधिर आहे. तर त्याची पत्नी देखील मूकबधिर आहे. तर आरोपी जय प्रवीण चावडा व शिवजीत सुरेंद्र सिंग हे पायधुनी येथील गुलाल वाडी परिसरात राहतात. या तिघांची क्रिकेट खेळताना मैत्री झाली होती. जय हा अंधेरीतील एका लॅबमध्ये अॅनिमेशनचे तर काम करतो तर शिवजीत हा बेरोजगार आहे. हे तिघेही जयच्या घरी दारू पिण्यासाठी दररविवारी एकत्र येत होते. रविवारी देखील त्यांनी पार्टी केली. मात्र, बायको वरून तेव्हा अर्शद आणि शिवजीतमध्ये वाद सुरू झाला. याच वादात शिवजितने अर्शदला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याचे कपडे काढून त्याला बांधले व दारूच्या बाटल्याने त्याच्यावर वार केले. यावेळी जय दोघांचा व्हिडिओ काढत होता. दरम्यान, अर्शद हा सोडून देण्यासाठी गयावया करत होता. मात्र, शिवजीतने घरातील हातोड्याने अर्शदच्या डोक्यावर वार केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
जय आणि शिवजीत हे दोघेही दारू प्यायले होते. शिवजीत दारूच्या नशेत असल्याने त्याने जयला धमकावले तसेच अर्शद च्या मृतदेहाची विल्हेवाट लावायला सांगितले. रविवारी ८.३० च्या सुमारास अर्शदची हत्या केल्यावर घरातील एका मोठ्या सुटकेसमध्ये दोघांनी अर्शदचा मृतदेह कोंबला. यानंतर दोघांनी मृतदेह हा खाली आणत टॅक्सी पकडून त्यांनी दादर स्टेशन गाठले. मात्र, त्यांच्या चेहऱ्यावरील हाव भाव पाहून गस्तीवर असलेल्या रेल्वे पोलिसांना त्यांच्या हालचालींचा संशय आला. त्यांच्या बॅगेची झडती घेतली असता, त्यात अर्शदचा मृतदेह असल्याचे आढळले.