Beed Santosh Deahmukh Murder Case: बीडमध्ये मस्साजोगचे सरपंचसंतोष देशमुख यांच्या हत्येला एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी लोटला. या प्रकरणी वाल्मीक कराडसह सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. या पैकी तिघांवर मोक्का लावण्यात आला आहे. तर वाल्मीक कराडवर केवळ खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. वाल्मीक कराडवर मोक्का लावण्यात यावा यासाठी अनेक संघटना आंदोलनाच्या तयारीत आहेत. यामुळे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था कायम राहावी या उद्देशाने आजपासून २८ तारखेपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. या आदेशामुळे आता पुढील १५ दिवस बीडमध्ये आंदोलन करता येणार नाही.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणावरुन गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्ह्यातील राजकीय व सामाजिक वातावरण पेटून उठले आहेत. याप्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींवर मोक्का लावण्यात आला आहे. तर वाल्मिक कराडवर केवळ खंडणीचा गुन्हा दाखल आहे. त्यामुळे ग्रामस्थ संतप्त असून वाल्मिक कराडवर मोक्का लावून त्याच्यावर ३०२ कलमातंर्गत कारवाई करा, अशी मागणी देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी व ग्रामस्थांनी केली आहे. काल धांजय देशमुख यांनी गावात पाण्याच्या टाकीवर चढून जीव देण्याचा प्रयत्न देखील केला होता. त्यामुळे पोलिस प्रशासनाची मोठी अडचण झाली होती. तसेच मराठा आंदोलक मनोज जरागे पाटील यांनी देखील मोठा लढा उभारण्याचा इशारा दिला होता. यासह इतर संघटनांनी देखील आज पासून बीडमध्ये आंदोलन करण्याची तयारी सुरू केली होती. त्यामुळे बीडमध्ये आंदोलन चिघळण्याची शक्यता होती. या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश जिल्हाधिकऱ्यांनी दिला आहे. १४ तारखेपासून २८ तारखेपर्यंत जमावबंदी आदेश लागू राहणार आहे.
या आदेशानुसार बीड जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना मोर्चे निदर्शने आंदोलने धरणे करण्यासाठी व जमावास परवानगी शिवाय एकत्र येता येणार नाही. बीडचे अप्पर जिल्हा दंडाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी हे आदेश लागू केले आहेत.
दरम्यान धनंजय देशमुख हे नव्याने स्थापन करण्यात आलेल्या एसआयटी पथकाचे प्रमुख डॉ. बसवराज तेली यांची भेट घेणार आहेत. या प्रकरणी वाल्मीक कराडवर खंडणीसा अपहरण आणि खून केल्याप्रकरणी मोक्का लावण्याची मागणी केली जाणार आहे. सर्व पुरावे असल्याचे धनंजय देशमुख यांनी म्हटले असून हे पुरावे त्यांना देण्यात येणार असल्याचे देखील ते म्हणाले. नवीन एस आयटी मधील कोणत्याही अधिकाऱ्यावर आमचा आक्षेप नाही, असे धनंजय देशमुख यांनी यावेळी सांगितले.
खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याची आज १४ दिवसांची पोलीस कोठडी संपली आहे. आज वाल्मीक कराडला केज येथील सत्र न्यायालयात हजर केले जाणार आहे. यापूर्वी वाल्मिक कराड याची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे.
संबंधित बातम्या