वाळू माफियाचा शिंदे गटात प्रवेश; थेट मिल्ट्री संरक्षण देण्याचं प्रलोभन?
शिंदे गटात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना प्रवेश दिला गेला असल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार बाबाजानी दुर्रानी यांनी केला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नुकतेच परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील ८४ सरपंचांनी शिंदे गटात प्रवेश केल्याच्या घटनेनंतर येथील राजकारण चांगलंच तापलं आहे. प्रवेश केलेल्या सरपंचांपैकी अनेकांची पार्श्वभूमी ही गुन्हेगारी स्वरुपाची असून शिंदे गटात प्रवेश केलेल्या एका वाळू माफियाला वाळू उपसादरम्यान लष्कराचं संरक्षण पुरवण्याचं आश्वासन देण्यात आल्याचा खळबळजनक आरोप परभणी जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसने नेते, विधानपरिषद सदस्य बाबाजानी दुर्रानी यांनी केला आहे. शिंदे गटात प्रवेश केलेल्या सरपंचांपैकी अनेक जण राष्ट्रवादी कॉग्रेसचे कार्यकर्ते असल्याचं बोललं जातं.
ट्रेंडिंग न्यूज
‘शिंदे गटाच्या प्रवेशादरम्यान मंचावर उपस्थित असलेल्या अनेकांची पार्श्वभूमी ही गुन्हेगारी स्वरुपाची होती. या लोकांची पार्श्वभूमी मुख्यमंत्री शिंदे यांनी आधी तपासून घ्यायला हवी होती’, असं दुर्रानी म्हणाले. ते पुढे म्हणाले, ‘परभणी जिल्ह्यात नाना टाकळकर हा मोठा वाळू माफिया आहे. त्याला संरक्षण हवे होते. शिंदे गटात प्रवेश केल्यास आम्ही तुला मिल्ट्रीच्या संरक्षणात वाळू काढून देऊ', असं आश्वासन या वाळू माफियाला देण्यात आल्याची माहिती दुर्रानी यांनी दिली.
पक्ष प्रवेशावेळी परभणी जिल्ह्यातलं शिंदे गटाचा एकही नेता तेथे उपस्थित नव्हता. वाशिमच्या खासदार भावना गवळी येथे येऊन लोकांचे प्रवेश घडवत आहेत. मुख्यमंत्र्यांनी स्थानिक नेत्यांना किमान विचारायला हवे होते’ असंं दुर्रानी म्हणाले.
पाथरी तालुक्यातून ४० नव्हे फक्त तीन सरपंच शिंदे गटात
परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यात एकूण ५० सरपंच आहेत. त्यापैकी ३४ सरपंच हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पाथरी तालुक्यातील एकूण ४० सरपंचांनी शिंदे गटात प्रवेश केल्याचा प्रचार करण्यात येतोय. परंतु केवळ तीन सरपंच आणि एका उपसरपंचाने शिंदे गटात प्रवेश केल्याचं दुर्रानी म्हणाले. त्यापैकी एक वंचित बहुजन आघाडी, एक अपक्ष आणि एक सरपंच हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा सदस्य होता अशी माहिती दुर्रानी यांनी दिली.
एक कोटी रुपयांच्या निधीचं आश्वासन
परभणी जिल्ह्यात सईद खान यांच्या मार्फत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सरपंचांना फोन करण्यात आले होते. शिंदे गटात प्रवेश केल्यास त्यांना एक कोटी रुपयांचा निधी देतो, असं प्रलोभन सरपंचांना देण्यात आल्याचा आरोप यावेळी दुर्रानी यांनी केला.
संबंधित बातम्या