मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Court Slams ED: संजय राऊत यांची अटकच बेकायदेशीर.. राऊतांना जामीन देताना कोर्टाने ED ला झाप झाप झापलं

Court Slams ED: संजय राऊत यांची अटकच बेकायदेशीर.. राऊतांना जामीन देताना कोर्टाने ED ला झाप झाप झापलं

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Nov 09, 2022 07:01 PM IST

PMLA Court Slams ED : संजय राऊत यांना जामीन मंजूर करताना पीएमएलए कोर्टाने ईडीला चांगलंच फटकारलं आहे. ईडीने आपल्या अधिकारांचा गैरवापर करत संजय राऊत व प्रवीण राऊत यांना बेकायदेशीर अटक केल्याचे मत न्यायालयाने नोंदवले आहे.

राऊतांना जामीन देताना कोर्टाने ED ला झाप झाप झापलं
राऊतांना जामीन देताना कोर्टाने ED ला झाप झाप झापलं

मुंबई – मुंबईतील पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay raut) तब्बल १०१ दिवसांनंतर तुरुंगाबाहेर येत आहेत. पीएमएलए कोर्टाने संजय राऊत यांना जामीन मंजूर केला आहे. त्याचवेळी कोर्टाने ईडीला झाप झाप झापलं आहे. ईडीला फटकारताना कोर्टाने म्हटले की, ईडीने (Enforcement Directorate) आपल्या अधिकारांचा गैरवापर केला असून संजय राऊत आणि प्रविण राऊत यांची अटकच बेकायदेशीर आहे.

न्यायलयाने मत नोंदवलं आहे, की, ईडीने आपल्या मनमानीप्रमाणे आरोपी निवडले. मुख्य आरोपी असलेल्या राकेश सारंग, एचडीआयएल,म्हाडा आणि सरकारी अधिकाऱ्यांना ईडीने अटक केली नाही, असं कोर्टाने त्यांच्या निकालाच्या कॉपीमध्ये म्हणलं आहे. ईडीने आपल्या अधिकारांचा गैरवापर केला असल्याचंही परखड मत न्यायालयाने मांडलं आहे.

संजय राऊत यांना पीएमएलए कोर्टाने जामीन मंजूर केल्यानंतर ईडीने याविरोधात हायकोर्टात धाव घेतली,पण हायकोर्टाने मात्र ईडीची याचिका फेटाळून लावली आणि संजय राऊत आणि प्रविण राऊत यांचा मुक्त होण्याचा मार्ग मोकळा झाला. ईडीला दिलासा द्यायला हायकोर्टाने नकार दिला.

न्यायमूर्ती आणि ईडीच्या वकिलांमध्ये खडाजंगी...

पीएमएलए कोर्टातील न्यायाधीश देशपांडे यांनी पत्राचाळ घोटाळा प्रकरणात खासदार संजय राऊतांना जामीन मंजुर करताच ईडीचे वकील अनिल सिंह यांनी जामीनाला तात्काळ स्थगिती देण्याची मागणी केली. त्याला उत्तर देताना न्यायमूर्ती देशपांडे म्हणाले की, तुम्ही कोर्टानं दिलेल्या निकालावर आक्षेप कसा घेऊ शकता?, त्याला उत्तर देताना ईडीचे वकील म्हणाले की, आम्ही न्यायालयाच्या निर्णयाचं आदर करतो, परंतु कोर्टाच्या निकालाविरोधात दाद मागण्यासाठी आम्हाला काही वेळ हवा आहे, त्यामुळं या राऊतांच्या जामीनाला त्वरित स्थगिती देण्यात यावी, ईडीच्या वकिलांचा असा युक्तिवाद ऐकताच न्यायमूर्ती चांगलेच भडकल्याचं पाहायला मिळालं. 'जर या प्रकरणाची पुन्हा सुनावणी झाली तर त्यात कोर्टाच्या निकालावर घेण्यात आलेल्या आक्षेपाचाही मी त्यात समावेश करेन', असं म्हणत न्यायमूर्तींनी ईडीच्या वकिलांना खडसावलं.

पीएमएलए कोर्टानंतर हायकोर्टनेही राऊतांचा जामीन मंजूर केला आहे,त्यामुळे संजय राऊत संध्याकाळी ७ वाजेपर्यंत आर्थर रोड जेलच्या बाहेर यायची शक्यता आहे. मागच्या १०० दिवसांपासून संजय राऊत आर्थर रोड जेलमध्ये होते.

 

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या

विभाग