IAS Pooja Khedkar Case : केंद्रीय लोकसेवा आयोगाची (यूपीएससी) परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी फसवणुकीचा मार्ग वापरल्याचा आरोप असलेल्या प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने गुरुवारी फेटाळून लावला. त्यामुळे पूजा खेडकर यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.
बोगस प्रमाणपत्राबाबत यूपीएससीने कारवाई करत पूजा खेडकर यांचे आयएएस पद काढून घेतलं असून तिला भविष्यात कोणत्याही परीक्षेला बसण्यास मनाई केली आहे. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानेही तिचा अटकपूर्व जामीन नाकारला आहे. यूपीएससीमध्ये खोटं दिव्यांग प्रमाणपत्र सादर केल्याचा आरोप करत पूजा खेडकरवर दिल्लीमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यामध्ये आपल्याला अटक होऊ नये यासाठी पूजा खेडकरने अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. तो न्यायालयाने नाकारला आहे. दिल्ली पोलिसांनी तपासाची व्याप्ती वाढवण्याची गरज आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे.
यूपीएससीच्या काही अंतर्गत व्यक्तींनी तिला मदत केली आहे का, याचा शोध घेण्याचे निर्देशही न्यायालयाने पोलिसांना दिले आहे. बुधवारी संघ लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकाऱ्याची तात्पुरती उमेदवारी रद्द केली. यूपीएससीने घेतलेल्या कोणत्याही परीक्षेला बसण्यासही संस्थेने मनाई केली आहे.
"यूपीएससीने उपलब्ध रेकॉर्डची काळजीपूर्वक तपासणी केली आहे आणि सीएसई-२०२२ नियमांच्या तरतुदींचे उल्लंघन केल्याबद्दल तिला दोषी ठरवले आहे. सीएसई-२०२२ साठी तिची तात्पुरती उमेदवारी रद्द करण्यात आली आहे आणि तिला यूपीएससीच्या भविष्यातील सर्व परीक्षा / निवडीपासून कायमचे प्रतिबंधित करण्यात आले आहे. पूजा खेडकर हिने यूपीएससी परीक्षेत अखिल भारतीय स्तरावर ८२१ वा क्रमांक पटकावला होता.
पूजा मनोरमा दिलीप खेडकर यांच्या प्रकरणाच्या पार्श् वभूमीवर यूपीएससीने सन २००९ ते २०२३ या १५ वर्षांत सीएसईच्या अंतिम शिफारस केलेल्या १५ हजारांहून अधिक उमेदवारांच्या उपलब्ध आकडेवारीची सखोल तपासणी केली आहे. या सविस्तर प्रक्रियेनंतर पूजा मनोरमा दिलीप खेडकर यांचे प्रकरण वगळता अन्य कोणत्याही उमेदवाराने सीएसई नियमांनुसार परवानगीपेक्षा जास्त अर्ज केल्याचे आढळून आलेले नाही. पूजा मनोरमा दिलीप खेडकर यांच्या एकमेव प्रकरणात यूपीएससीच्या स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजरला (एसओपी) तिच्या प्रयत्नांची संख्या शोधता आली नाही, कारण तिने केवळ नावच नव्हे तर आई-वडिलांचेही नाव बदलले. भविष्यात अशा प्रकारची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी यूपीएससी एसओपी अधिक मजबूत करण्याच्या प्रक्रियेत आहे, असे यूपीएससीने म्हटले आहे.
संघ लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) दाखल केलेल्या तक्रारीवरून दिल्ली पोलिसांनी तिच्याविरोधात एफआयआर दाखल केला होता. पूजा खेडकर यांना महाराष्ट्र सरकारच्या जिल्हा प्रशिक्षण कार्यक्रमातून मुक्त केल्यानंतर दोन आठवड्यांनंतर यूपीएससीने ही कारवाई केली.
संबंधित बातम्या