Pune Drugs case : पुण्यात एका पार्टीत काही तरुण ड्रग्ससेवन करत असतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यामुळे पुण्यातील ड्रग्स तस्करीचा प्रश्न ऐरणीवर आला होता. या पूर्वी देखील पुण्यात ड्रग्स तस्करीचे व ड्रग्स निर्मिती करून त्याच्या तस्करीचे प्रकरणे उघडकीस आले आहेत. यानंतर पुणे पोलिसांनी मोठी कारवाई करून सुद्धा ही तस्करी थांबलेली नाही. तस्करांनी आता नशेखोरांना आता थेट कुरिअरद्वारे होमडिलिव्हरीद्वारे ड्रग्स पुरवठा करत असल्याचं पुढं आलं आहे. या प्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी एकला अटक केली आहे.
पुण्यात विश्रांतवाडी परिसरातून दोन दिवसांपूर्वी तब्बल १ कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून त्यांची चौकशी केली असतांना धक्कादायक माहिती तपास पथकाला मिळाली. नशेखोरांना घरपोच कुरिअर द्वारे ड्रग्सची डिलिव्हरी होत असल्याची माहिती पुढे आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी कुरिअर कंपनीतील एका कर्मचाऱ्याला अटक केली आहे. अमली पदार्थ तस्करांकडून देण्यात आलेले ड्रग्स हे कुरिअर कंपनीतील कर्मचारी नशेबाजांना पोहोचवित असल्याचं तपासात उघड झालं आहे.
विश्वनाथ कोनापुरे (वय ४८, रा. काळेपडळ, हडपसर, मूळ रा. सोलापूर) असे अटक करण्यात आलेल्या कुरिअर कंपनीच्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. विश्रांतवाडीतील धानोरी भागात पोलिसांनी छापा टाकून १ कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त केले होते. याप्रकरणी श्रीनिवास संतोष गोंदजे, रोहित बेडे, निमेश आबनावे यांना अटक करण्यात आली होती. यावेळी पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली. त्यानंतर आरोपींनी मेफेड्रोन कोठून आणले, ते कुणाला आणि कसे विकले याची माहिती दिली. यातून या प्रकारचा उलगडा झाला. तपासात मिळालेल्या माहितीनुसार कुरिअर कंपनी कर्मचारी कोनापुरेला पोलिसांनी अटक केली.
कोनापुरे हा पुण्यातील एका कुरिअर व्यावसायिकाकडे काम करत असून तो या आरोपींच्या संपर्कात होता. त्यांनी दिलेले मेफेड्रोन कोनापुरे कुरिअर करून नशेबाजांना थेट घरी जाऊन देत होता. आरोपींनी पुण्यात आणि पुण्याबाहेर या माध्यमातून ड्रग्स तस्करी केल्याचं देखील तपासात उघड झालं आहे.