मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Corona: मास्क बंधनकारक होणार? टास्क फोर्सने राज्य सरकारला दिला 'हा' सल्ला

Corona: मास्क बंधनकारक होणार? टास्क फोर्सने राज्य सरकारला दिला 'हा' सल्ला

Dilip Ramchandra Vaze HT Marathi
Jun 07, 2022 02:22 PM IST

राज्यात वाढत्या करोना व्हायरसच्या प्रादुर्भावानं टास्क फोर्सने राज्य सरकारला काही शिफारसी केल्या आहेत.

टास्क फोर्सने राज्य सरकारला केल्या शिफारसी
टास्क फोर्सने राज्य सरकारला केल्या शिफारसी (हिंदुस्तान टाइम्स)

गेल्या एक आठवडयापासून राज्यात करोनाबाधितांच्या (Corona Virus) संख्येनं उसळी घेतली असल्याचं चित्र आहे. आता मात्र राज्य सरकारला (State Govt.) टास्क फोर्सने पुन्हा एकदा काही महत्वपूर्ण शिफारसी केल्या आहेत. यात सर्वात महत्वाची शिफारस म्हणजे  गर्दीच्या किंवा सार्वजनिक ठिकाणी पुन्हा एकदा मास्क (Mask) वापरणं बंधनकारक करावं अशी महत्वाची सूचना या टास्क फोर्सने केली आहे.

सार्वजनिक स्थळं, गर्दीची ठिकाणं, सिनेमा हॉल, नाट्यगृह, मॉल,धार्मिक स्थळं, उद्यानं अशा गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरणं बंधनकारक करावं असं राज्य सरकारला सुचवण्यात आलं आहे. राज्यात करोनाचे रुग्ण वाढत असल्याने टास्क फोर्सने ही अत्यंत महत्वपूर्ण सूचना राज्य सरकारला केली आहे. काही दिवसापूर्वीच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनीही सार्वजनिक ठिकाणी लोकांनी मास्क वापरावा असं आवाहन केलं होतं. मात्र मास्क न वापरल्यास दंडाचा कोणताही विचार सध्या नसल्याचं राज्य सरकारने स्पष्ट केलं होतं. सध्या करोना रुग्णांमध्ये ताप येणं हे प्रमुख लक्षण आढळून येत आहे. राज्यातल्या काही नेत्यांनाही करोनाची लागण झालेली पाहायला मिळाली आहे. त्यामुळे ९९ पेक्षा जास्त ताप असल्यास RAT/RTCR चाचणी केली गेली पाहिजे. संबंधित व्यक्तीची ही चाचणी पॉझिटीव्ह आल्यानंतर त्या व्यक्तीच्या संपर्कातील लोकांची चाचणी केली पाहिजे, असेही टास्क फोर्सने म्हटले आहे. अशा करोनाबाधित व्यक्तींना होम क्वारंटाइन अत्यंत महत्वाचं असल्याचं टास्क फोर्सचं म्हणणं आहे. 

राज्यात गेल्या आठवड्यात १३५ टक्क्यांनी वाढले करोनाचे रुग्ण 

मुंबईत एका आठवड्यात १३५ टक्कयांनी करोनाचे रुग्ण वाढलेले पाहायला मिळाले आहेत. तर ठाण्यात हीच रुग्णवाढ १९१ टक्के इतकी पाहायला मिळतेय. पुण्यात ५० टक्के करोनाचे रुग्ण वाढले आहेत तर रायगडमध्ये १३० टक्के करोना रुग्ण वाढ झालेली पाहायला मिळतेय. पालघर जिल्ह्यात सर्वात जास्त म्हणजेच ३५० टक्के करोनाचे रुग्ण वाढलेले पाहायला मिळालेत. दोनच दिवसांपूर्वी राज्य सरकारने राज्यातल्या नागरिकांना मास्क वापरण्याचं आवाहन केलं होतं. त्या आवाहनाला आज मोजकेच नागरिक प्रतिसाद देताना पाहायला मिळत आहेत. आगामी काही दिवसात शाळा सुरू होणार आहेत. त्यापार्श्वभूमीवर करोनाची स्थिती येणाऱ्या काही दिवसात वाढतेय की कमी होतेय याचा अंदाज घेऊन शाळा सुरु करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. करोनाचे आकडे वाढल्यास आगामी दिवसात येणाऱ्या आषाढी वारीबाबतही राज्य सरकारला मोठा निर्णय घ्यावा लागू शकतो.

IPL_Entry_Point

विभाग