मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  महाराष्ट्रात ओमायक्रॉनचा सब व्हेरिअंट, पुण्यात २ रुग्ण आढळले

महाराष्ट्रात ओमायक्रॉनचा सब व्हेरिअंट, पुण्यात २ रुग्ण आढळले

Suraj Sadashiv Yadav HT Marathi
Jul 23, 2022 08:41 AM IST

Corona Update Maharashtra: महाराष्ट्रात गेल्या २४ तासात २५१५ नवे कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर दिवसभरात २४४९ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

पुण्यात ओमायक्रॉनच्या दोन रुग्णांची नोंद
पुण्यात ओमायक्रॉनच्या दोन रुग्णांची नोंद (फोटो - हिंदुस्तान टाइम्स)

Corona Update Maharashtra: देशात गेल्या महिन्याभरात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत असलेली दिसत आहे. सलग पाच दिवस देशात २० हजारांहून जास्त रुग्णांची नोदं झाली आहे. दुसऱ्या बाजूला कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्याही अधिक असल्यानं ही बाब दिलासा देणारी आहे. दरम्यान, आता महाराष्ट्राची चिंता वाढण्याची शक्यता असून ओमायक्रॉनच्या सब व्हेरिअंटचे दोन रुग्ण आढळून आले आहेत. पुण्यात दोन रुग्णांना ओमायक्रॉनचा सब व्हेरअंट बीए. ५ ची लागण झाल्याचं समोर आलं आहे.

पुण्यातील हे दोन रुग्ण महाराष्ट्रातील नसून बाहेरच्या राज्यातील आहेत. मात्र सध्या ते कामानिमित्त पुण्यात राहत असल्याचं आरोग्य विभागाने म्हटलं आहे. दोन्ही रुग्णांचे नमुने एनआयव्ही पुणे इथे पाठवले होते. त्यात ओमायक्रॉनच्या सबव्हेरिअंट बीए.५ ची लागण झाल्याचं आढळून आलं. दोघेही परदेशातून आल्यानंतर त्यांची तपासणी केल्यानंतर रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते.

दोन्ही रुग्णांमध्ये कोणत्याही प्रकारची लक्षणे आढळून आलेली नाहीत. त्यांना विलगीकरणात ठेवलं होतं. आता ते कोरोनामुक्त झाले असल्याचंही आरोग्य विभागाने सांगितलं. दुबईतून ते पुण्यात आले होते. विमानतळावर नेहमीप्रमाणे कोरोना टेस्ट केली असता त्यात ते पॉझिटिव्ह आढळले होते.

राज्यात ओमायक्रॉनच्या बीए.४ आणि बीए.५ सब व्हेरिअंटच्या रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. राज्यात आतापर्यंत या रुग्णांची एकूण संख्या १६० पर्यंत पोहोचली आहे. यात सर्वाधिक रुग्ण हे पुण्यात ९३ आढळले आहेत. तर मुंबईत ५१, ठाण्यात ५, नागपूरमध्ये ४, पालघरमध्ये ४ आणि रायगडमध्ये ३ जण आढळले आहेत.

महाराष्ट्रात गेल्या २४ तासात २५१५ नवे कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर दिवसभरात २४४९ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. राज्यात २४ तासात ६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. आतापर्यंत एकूण कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ७८ लाख ६७ हजार २८० इतकी आहे. राज्यात कोरोनामुक्त होण्याचं प्रमाण ९७.९७ टक्क्यांवर पोहोचलं असून मृत्यूजर हा १.८४ टक्के इतका आहे.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या