मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  राज्यात कोरोनाचा नवा व्हेरिअंट? राजेश टोपे म्हणाले, 'जे रुग्ण आढळले ते…'

राज्यात कोरोनाचा नवा व्हेरिअंट? राजेश टोपे म्हणाले, 'जे रुग्ण आढळले ते…'

Suraj Sadashiv Yadav HT Marathi
Jun 16, 2022 08:13 AM IST

महाराष्ट्रात गेल्या २४ तासात ४०२४ नव्या रुग्णांची नोंद झाली. यात बीए.५ व्हेरिअंटचे ४ रुग्ण आढळून आले आहेत.

आरोग्य मंत्री राजेश टोपे
आरोग्य मंत्री राजेश टोपे

राज्यात गेल्या २४ तासात ४ हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये ओमिक्रॉनच्या सब व्हेरिअंटचे रूग्ण आहेत, यात नवा प्रकार आढळलेला नाही असं आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी सांगितले. राज्यात आता शाळाही सुरू झाल्या असून १२ ते १८ वयोगटातील ज्या मुलांचे लसीकरण झालेलं नाही ते करावं आणि मास्कचा वापर करण्याचं आवाहन टोपे यांनी केले. (Maharashtra Covid 19 updates)

राज्यातील रुग्णवाढीबाबत बोलताना राजेश टोपे म्हणाले की, रुग्णसंख्या वाढत असली तरी ही वाढ ठराविक जिल्ह्यांपुरती मर्यादीत आहे. मुंबई, पुणे, ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यात वाढ होत आहे. मुंबईत संसर्ग दर हा ४० टक्क्यांवर पोहोचल्याने आरोग्य विभाग परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. दुसऱ्या बाजुला रुग्ण रुग्णालयात दाखल होण्याचं प्रमाण हे दोन ते तीन टक्के असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली.

राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्यानं आरोग्य विभाग सावध झाला आहे. हर घर दस्तक या सूचनेनुसार आशा सेविका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत लसीकरणासाठी जनजागृती केली जात आहे. लसीकरण वाढवण्यावर भर दिला जात असल्याचंही राजेश टोपेंनी सांगितले.

महाराष्ट्रात गेल्या २४ तासात ४०२४ नव्या रुग्णांची नोंद झाली. तर दिवसभरात ३०२८ जण कोरोनामुक्त झाले. २ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. सध्या राज्यातील सक्रीय रुग्णांची संख्या १९ हजार २६१ इतकी आहे. राज्यात बीए.५ व्हेरिअंटचे ४ रुग्ण आढळून आले आहेत. बीए. ५ व्हेरियंटचे आणखी ४ रुग्ण राज्यात आढळून आले आहेत. या पैकी प्रत्येकी १ रुग्ण मुंबई,ठाणे,नवी मुंबई आणि पुणे येथील आहे. हे सर्व रुग्ण १९ ते ३६ वर्षे वयोगटातील महिला आहेत.

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग