Pune Contractor Murder: महाराष्ट्र निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातून खळबळजनक माहिती समोर आली. सिंहगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या डोणजे गावचे माजी उपसरपंच आणि कंत्राटदार विठ्ठल पोळेकर यांची अपहरण करून हत्या करण्यात आली. विठ्ठल पोळेकर हे गुरुवारी सकाळी मॉर्निंग वॉकसाठी गेले असता घरी न परल्याने त्यांच्या नातेवाईकांनी पोलिसांत तक्रार दिली. त्यानंतर आज खडकवासला धरणाच्या पाण्यात ओसाडे गावच्या हद्दीत विठ्ठल पोळेकर यांच्या मृतदेहाचे तुकडे आढळून आले. याप्रकरणी पोलीसांनी पुढील तपासाला सुरुवात केली आहे.
मॉर्निंग वॉकला गेलेले विठ्ठल पोळेकर घरी न परतल्याने त्यांच्या नातेवाईकांनी परिसरातील कुख्यात गुंड बाबू मामे यांच्याविरोधात तक्रार दिली. बाबू मामे याने काही दिवसांपूर्वी पोळेकर यांच्या पुण्यातील कार्यालयात जाऊन जग्वार किंवा दोन कोटी रुपयांची खंडणी देण्याची मागणी केली होती. यामुळे त्याने पोळेकर यांचे अपहरण केले असावे, असे तक्रारीत नमूद करण्यात आले होते. मात्र, आज सकाळी पोळेकर हे मृतावस्थेत सापडल्यानंतर बाबु मामे आणि विठ्ठ्ल पोळेकर यांच्यात काय कनेक्शन होते? याचा पोलीस तपास करीत आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली.
पुण्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून कठोर पावले उचलली जात असताना एका कंत्राटदाराचे अपहरण करून हत्या करण्यात आल्याने पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. कंत्राटदार विठ्ठल पोळेकर यांचे अपहरण नेमके कोणी आणि कशासाठी केले? हे अद्याप समजू शकलेले नाही. या घटनेचा तपास करण्यासाठी पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत.