मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  viral video : नाना पटोले यांनी काँग्रेस कार्यकर्त्याकडून पाय धुवून घेतले; व्हिडिओ वाऱ्यासारखा व्हायरल, पाहाच!

viral video : नाना पटोले यांनी काँग्रेस कार्यकर्त्याकडून पाय धुवून घेतले; व्हिडिओ वाऱ्यासारखा व्हायरल, पाहाच!

Jun 18, 2024 04:19 PM IST

Nana Patole feet washing video viral : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे पक्षाच्या कार्यकर्त्याकडून पाय धुवून घेत असल्याचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. यावरून पटोलेंसह काँग्रेसवर टीकेची झोड उठली आहे.

नाना पटोले यांनी काँग्रेस कार्यकर्त्याकडून पाय धुवून घेतले; व्हिडिओ वाऱ्यासारखा व्हायरल
नाना पटोले यांनी काँग्रेस कार्यकर्त्याकडून पाय धुवून घेतले; व्हिडिओ वाऱ्यासारखा व्हायरल

Nana Patole feet washing video viral : महाविकास आघाडीतील शिवसेना(उद्धव ठाकरे) व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांशी जुळत नसल्यामुळं सध्या चर्चेत असलेले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आता नव्या वादात अडकले आहेत. अकोला इथं एका कार्यकर्त्याकडून पटोले यांनी पाय धुवून घेतल्याचं समोर आलं आहे. हा व्हिडिओ व्हायरल होताच भाजपनं काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. सोशल मीडियातही पटोले यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.

अकोला जिल्ह्यातील वडगाव इथला हा व्हिडिओ आहे. पक्षाच्या एका कार्यकर्त्यानं आयोजित केलेल्या वाढदिवसाच्या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी पटोले अकोल्याला गेले होते. तिथून परतताना त्यांचे पाय चिखलानं माखले. ते पाहून एक कार्यकर्ता पुढं आला आणि त्यांचे पाय धुवू लागला. पटोले हे त्यावेळी कारमध्ये बसले होते. त्यांनी कुठलाही संकोच न बाळगता पाय त्याच्या पुढं धरले होते. पटोले यांना यात काहीही चुकीचं वाटल्याचं व्हिडिओत दिसत नाही. हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला.

ट्रेंडिंग न्यूज

पटोले यांच्या या वागणुकीमुळं त्यांच्यासह काँग्रेसवर टीकेची झोड उठली आहे. भाजपनं या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून काँग्रेसवर तोफ डागली आहे. 'काँग्रेस नेहमीच जनतेला पायाची धूळ समजत आली आहे. नाना पटोले यांनी चिखलात माखलेले पाय कार्यकर्त्याला धुवायला लावले. काँग्रेसची ही सरंजामी वृत्ती त्यांच्या नसांनसांत भिनली आहे. यांच्या हातात सत्ता गेली तर गरिबांना दिवस ‘हालात’ काढावे लागतील याचा हा पुरावा आहे, असं महाराष्ट्र भाजपनं म्हटलं आहे.

भाजपचे प्रवक्ते शेहजाद पूनावाला यांनी एक्स अकाऊंटवरून या घटनेचा निषेध केला आहे. 'काँग्रेसची ही शेहजादा मानसिकता आहे. ते जनतेला आणि कामगारांना गुलाम समजतात आणि स्वतः राजा-राण्यांसारखे वागतात. विरोधी पक्षात असताना हे लोक असं वागत आहेत, सत्तेत असताना काय होईल याची कल्पना येऊ शकते, असं पूनावाला यांनी म्हटलं आहे. जनतेचा अपमान केल्याबद्दल नाना पटोले आणि काँग्रेसनं माफी मागितली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

नाना पटोले काय म्हणाले?

'प्रसार माध्यमामधून माझ्याबद्दलचा एक व्हिडिओ दाखवून मला जाणीवपूर्वक बदनाम केले जात आहे, परंतु त्यात काही तथ्य नाही. अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना संत गजानन महाराजांची पालखी तिथं आली होती, मी वारकरी संप्रदायाचा असून गजानन महाराजांचं दर्शन घेण्यास गेलो असताना चिखलानं पाय माखले होते, एका कार्यकर्त्यांनं पायावर पाणी टाकलं आणि मी माझ्या हातानं माझे पाय धुतले, यात गैर काय आहे. मी शेतकरी माणूस आहे, मला चिखलाची सवय आहे, जे काही झालं ते दिवसाच्या स्वच्छ प्रकाशात झालं आहे. त्यात लपवण्यासारखं काहीच नाही, अशी प्रतिक्रिया पटोले यांनी दिली आहे.

WhatsApp channel
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर