अजितदादा, यातल्या एकाचं तरी लिंग कापून दाखवा! भाजपशी संबंधित आरोपींची यादी दाखवत काँग्रेसच्या महिला नेत्याचं आव्हान-congress women president sandhya sawalakhe challenges ajit pawar over women atrocities ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  अजितदादा, यातल्या एकाचं तरी लिंग कापून दाखवा! भाजपशी संबंधित आरोपींची यादी दाखवत काँग्रेसच्या महिला नेत्याचं आव्हान

अजितदादा, यातल्या एकाचं तरी लिंग कापून दाखवा! भाजपशी संबंधित आरोपींची यादी दाखवत काँग्रेसच्या महिला नेत्याचं आव्हान

Sep 05, 2024 04:25 PM IST

Sandhya Sawalakhe taunts ajit pawar : महिलांवर अत्याचार करणाऱ्यांचं लिंग कापून टाकण्याची भाषा करणाऱ्या अजित पवारांना काँग्रेसच्या नेत्या संध्या सव्वालाखे यांनी आव्हान दिलं आहे.

अजितदादा, यातल्या एका तरी भाजप नेत्याचं लिंग कापून दाखवा! यादी दाखवत काँग्रेसच्या महिला नेत्याचं आव्हान
अजितदादा, यातल्या एका तरी भाजप नेत्याचं लिंग कापून दाखवा! यादी दाखवत काँग्रेसच्या महिला नेत्याचं आव्हान

Sandhya Sawalakhe challenges Ajit Pawar : बदलापुरातील चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचारानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुन्हेगारांचं लिंगच कापून टाकण्याची भाषा केली होती. अजित पवारांच्या या वक्तव्याचा काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे यांनी जोरदार समाचार घेतला आहे.

अजित पवारांच्या या वक्तव्याबद्दल पत्रकारांनी सव्वालाखे यांना प्रतिक्रिया विचारली होती. त्यावर त्यांनी अजित पवार यांनाच सुनावलं. 'पुणे, मुंबईत सतत अत्याचाराच्या घटना घडतायत. तिकडं जाऊन त्यांनी हे काम करावं. महाराष्ट्र महिला काँग्रेस जागोजागी अजित पवारांचा सत्कार करेल, असं सव्वालाखे म्हणाल्या.

'माझ्याकडं भाजपच्या पदाधिकाऱ्यांची यादी आहे. या लोकांवर महिला अत्याचाराचे गुन्हे दाखल आहेत. यातील एका तरी पदाधिकाऱ्याचं लिंग अजित पवारांनी कापून दाखवावं. त्यांना गुलाब कपडे घालून फिरण्याची वेळ येणार नाही, असा सणसणीत टोला सव्वालाखे यांनी हाणला.

'गुलाबी कपडे आणि गुलाबी गाड्या घेऊन फिरण्याची वेळ तुम्हाला का आलीय? महिलांना कळलेलं आहे तुमची राजवट अत्याचारी आणि जुलमी आहे. तुम्हाला कुठल्या तरी गुरुजींनी सांगितलं असेल महिलांची मतं हवं असतील तर गुलाबी कपडे घाला. खरंतर त्याची गरज नाही. एका तरी आरोपीचं लिंग कापण्याची हिंमत दाखवा. तुम्हाला महिला भरभरून मतदान करतील. गुलाबी कपडे घालण्याचीही गरज लागणार नाही. आरोपींना पाठिशी घालण्याचं महापाप तुम्ही केलेलं आहे. आम्हाला आता तुम्ही आणखी फसवू नका. महाराष्ट्रातील कुठलीही महिला तुम्हाला फसणार नाही. गुलाबी कपडे सोडा, गुलाबी साड्या घातल्या तरी महिला तुम्हाला मतदान करणार नाहीत, असंही सव्वालाखे यांनी सुनावलं.

चित्रा वाघ यांच्यावरही सडकून टीका

बदलापूर घटनेनंतर भाजपच्या चित्रा वाघ बॅकफूटवर गेल्याचं दिसत असल्याचं पत्रकारांनी विचारलं असतं संध्या सव्वालाखे यांनी वाघ यांच्यावरही सडकून टीका केली. चित्रा वाघ या नेहमीच बॅकफूटवर असतात. त्यांना प्रसिद्धी पाहिजे असते तेव्हाच त्या पुढं येतात. त्या महिलांच्या बाजूनं बोलत नाहीत, त्या पक्षाची स्क्रिप्ट वाचत असतात. बदलापूरच्या घटनेनंतर त्यांनी ज्या प्रकारचा व्हिडिओ बनवला, तो पाहून मला लाज वाटते, असं सव्वालाखे म्हणाल्या.

भाजप आमदाराला जनता मतदानातून उत्तर देईल!

यवतमाळमध्ये पूरस्थिती असताना आर्णी- केळापूर विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार डॉ. संदीप धुर्वे हे गौतमी पाटील हिच्यासोबत जाहीर कार्यक्रमात नाचले होते. त्यावरूनही सव्वालाखे यांनी भाजपवर निशाणा साधला. पूरपरिस्थिती असताना आमदार नाचत असेल तर जाब कोणी विचारायचा? गौतमी पाटील ही पोटासाठी नाचली पण तुम्ही जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्यासाठी नाचलता. तुम्हाला जनता मतदानातून उत्तर देईल, असं त्यांनी धुर्वे यांना सुनावलं.