Maharashtra Assembly Election 2024: एकीकडे महायुतीतील घटक पक्ष भापजने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी ९९ उमेदवारांची आपली पहिली यादी जाहीर केली आहे. तर, दुसरीकडे महाविकास आघाडीत विदर्भातील जागांवरून वाद चालू आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेना विदर्भातून १२ जागा लढवण्यास ठाम आहेत. तर, या भागात आमची ताकद जास्त असल्याचा दावा करत आम्हीच अधिक जागांवरून निवडणूक लढवणार, अशी काँग्रेसची भूमिका आहे. यावर तोडगा काढण्यासाठी अनेक बैठका पार पडल्या. मात्र, अजूनही त्यावर तोडगा निघाला नाही. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस उद्या आपल्या ५४ उमेदवारांची नावे जाहीर करणार असल्याची माहिती समोर येत आहे. या यादीत अनेक बड्या नेत्यांचे नाव असल्याचे बोलले जात आहे.
काँग्रेसच्या पहिल्या यादीत काँग्रेस नेते नाना पटोले यांचे नाव सर्वात आघाडीवर असेल, जे साकोली मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढतील. तर, विजय वडेट्टीवार यांना ब्रम्हपुरी मतदारसंघातून तिकीट मिळण्याची शक्यता आहे. तिवसा मतदारसंघातून यशोमती ठाकूर यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर विरेंद्र जगताप-धामणगाव, अमित झनक- रिसोड, नितीन राऊत- उत्तर नागपूर, विकास ठाकरे- पश्चिम नागपूर, रणजित कांबळे- देवळी (वर्धा), सुभाष धोटे- राजूरा ( चंद्रपूर) डॉ. सुनील देशमुख - अमरावती शहर आणि बबलू देशमुख- अचलपूर हे काँग्रेसच्या पहिल्या यादीतील प्रमुख चेहरे असतील.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षानेआपल्या ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत अनेक दिग्गज नेत्यांना संधी देण्यात आली. भाजपने जाहीर केलेल्या त्यांच्या पहिल्या यादीनुसार, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपला बालेकिल्ला असलेल्या नागपूर दक्षिण पश्चिम मधून निवडणूक लढवणार आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे कामठीतून, तर भाजप नेते आणि राज्यसभेचे खासदार अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजय चव्हाण यांना भोकरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. या यादीत वांद्रे पश्चिम मतदारसंघातून मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार आणि कणकवली मतदारसंघातून पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि लोकसभेचे खासदार नारायण राणे यांचे चिरंजीव नितेश राणे यांच्या नावांचाही समावेश आहे. जामनेरमधून गिरीश महाजन, बल्लारपूरमधून सुधीर मुनगंटीवार, मलबार हिलमधून मंगलप्रभात लोढा, कुलाब्यातून राहुल नार्वेकर आणि साताऱ्यातून छत्रपती शिवरायांचे वंशज छत्रपती शिवेंद्रराजे भोसले हे प्रमुख उमेदवार आहेत.