MVA Seat Sharing : हरयाणा विधानसभा निवडणुकीत झालेल्या धक्कादायक पराभवाचा फटका काँग्रेसला महाराष्ट्रात बसण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी सध्या सुरू असलेल्या जागावाटपात काँग्रेस बॅकफूटवर जाण्याची चिन्हं आहेत. ठाकरेंची शिवसेना जागावाटपात आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता आहे. तसे संकेतच खासदार संजय राऊत यांनी दिले आहेत.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीत सध्या जागावाटपाची चर्चा सुरू आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील सर्वात मोठा पक्ष ठरल्यानं या चर्चेत काँग्रेसनं आक्रमक भूमिका घेतली होती. अधिकाधिक आणि हव्या त्या जागांसाठी काँग्रेसनं आग्रह धरला होता. विशेषत: मुंबई, कोकण व मराठवाड्यातील शिवसेनेच्या जागांवर काँग्रेसनं दावा केला. त्यामुळं चर्चेची गाडी अडकली होती. हरयाणाचा निकाल विरोधात गेल्यामुळं हे चित्र पालटलं आहे.
हरयाणामध्ये वातावरण अनुकूल असल्यामुळं तिथं काँग्रेस सहज बाजी मारेल, असं सर्वांनाच वाटत होतं. महाराष्ट्रातील काँग्रेस नेतेही तोच आत्मविश्वास घेऊन वावरत होते. लोकसभेच्या यशाला हरयाणाची जोड मिळाल्यास ठाकरेंना नमतं घ्यावं लागेल, असं दिल्लीपासून मुंबईपर्यंतच्या नेत्यांना वाटत होतं. मात्र, हरयाणात स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसचा पराभव झाला आहे. त्यामुळं काँग्रेसची अडचण झाली आहे.
हरयाणातील काँग्रेसच्या पराभवानंतर शिवसेना आक्रमक झाली आहे. खासदार संजय राऊत यांनी त्यांची चुणूक दाखवली आहे. त्यांनी पराभवावर बोलताना काँग्रेसवर टीका केली आहे. हातात असलेला विजय कसा घालवायचा हे काँग्रेसकडून शिकलं पाहिजे, असा टोला त्यांनी हाणला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस इंडिया आघाडीसोबत लढल्यामुळं तिथं विजय झाला. मात्र, हरयाणात काँग्रेसनं आम आदमी पक्षाला दूर ठेवलं. आमच्यासारख्या इतर छोट्या पक्षांना काही जागा दिल्या असत्या तर चित्र वेगळं असतं, असं म्हणत, राऊत यांनी आघाडीचं महत्त्व सांगितलं. काँग्रेस देशभरात स्वबळावर लढायचं असेल तर त्यांनी तसं जाहीर करावं आणि आम्हाला मोकळं करावं, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीमध्ये सर्वाधिक जागा शिवसेनेनं लढल्या होत्या. त्या खालोखाल काँग्रेस होती तर, सर्वात कमी १० जागा राष्ट्रवादी काँग्रेसनं लढल्या होत्या. मात्र, शिवसेनेपेक्षा कमी जागा लढवणाऱ्या काँग्रेसचे सर्वाधिक खासदार निवडून आले. त्यामुळं आम्हीच मोठा भाऊ अशी अप्रत्यक्ष भूमिका काँग्रेसनं घेतली होती. मात्र, काँग्रेसच्या जागा उद्धव ठाकरे यांच्या झंझावातामुळं व त्यांच्या चेहऱ्यामुळं निवडून आल्याचा शिवसेनेचा दावा आहे. त्यामुळंच विधानसभेच्या जागावाटपात दोघेही नमतं घेण्यास तयार नव्हते. हरयाणाच्या निकालामुळं हा पेच सुटेल अशी चिन्हं आहेत.