Mahanand Dairy : मोदी-शहांनी शिंदे, फडणवीसांनाही गुजरातला घेऊन जावं; ‘महानंद’वरून काँग्रेसचा टोला
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mahanand Dairy : मोदी-शहांनी शिंदे, फडणवीसांनाही गुजरातला घेऊन जावं; ‘महानंद’वरून काँग्रेसचा टोला

Mahanand Dairy : मोदी-शहांनी शिंदे, फडणवीसांनाही गुजरातला घेऊन जावं; ‘महानंद’वरून काँग्रेसचा टोला

Jan 03, 2024 06:45 PM IST

Congress on Mahanand Dairy Resolution : महानंद डेअरीचा कारभार केंद्रीय डेअरी बोर्डाकडं सोपवण्याच्या मुद्द्यावरून काँग्रेसनं राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.

Ekanth Shinde - Devendra Fadnavis - Ajit Pawar
Ekanth Shinde - Devendra Fadnavis - Ajit Pawar (PTI)

Mahanand Dairy Resolution : वेदांता फॉक्सकॉन, टाटा एअर बस, मुंबईतील हिरे व्यापारानंतर आता सहकार क्षेत्रातील एक महत्त्वाची ‘महानंद’ डेअरी गुजरातच्या दावणीला बांधली जात आहे. गुजरात लॉबीकडून महाराष्ट्र राजरोस लुटला जात असताना हे फक्त बघ्याच्या भूमिकेत आहेत. सह्यांपुरते उरले आहेत, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र काँग्रेसनं केली आहे. 'मोदी-शहांनी आता शिंदे, फडणवीस व अजित पवारांनाही गुजरातला न्यावं, असा जहरी टीका काँग्रेसनं केली आहे.

महानंद डेअरीचा संपूर्ण कारभार नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डकडे देण्याचा ठराव महानंदच्या संचालक मंडळानं केला आहे. त्यावरून मोठा गदारोळ उठला आहे. गुजरातमधील 'अमूल'ला महाराष्ट्रात मोकळं रान देण्यासाठीच हे सगळं केलं जात आहे, असा आरोप दूध उत्पादकांनी केला आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनीही या आरोपांना दुजोरा दिला आहे. लोंढे यांनी राज्यातील सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.

मुख्यमंत्र्यांनी राज्यात सामाजिक तेढ निर्माण करू नये; जितेंद्र आव्हाडांनी ट्विट केला ‘तो’ व्हिडिओ

'केंद्र सरकारच्या मदतीने सत्तेवर आलेल्या घटनाबाह्य शिंदे, फडणवीस, अजित पवार सरकारच्या काळात दररोज महाराष्ट्राला लुटलं जात आहेु. मुंबई, महाराष्ट्र लुटण्यासाठीच तोडफोडीचं राजकारण करून भाजपनं सत्ता बळकावली आहे. महाविकास आघाडी सरकार गुजरात लॉबीच्या कुटील हेतूंच्या आड येत होतं, गुजरात लॉबीसमोर होयबा करत नव्हतं म्हणूनच सरकार पाडलं व मागील दीड वर्षात महाराष्ट्राची अक्षरशः लुट सुरू आहे, असं लोंढे म्हणाले.

'एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना नाही म्हणण्याची हिम्मतच नाही. हे तिघेजण फक्त बघ्याची भूमिका घेत आहेत. हे तिघेही मोदी शहांसमोर फक्त ‘सह्याजीराव’ आहेत, दिल्लीनं दिलेल्या आदेशानुसार फाईलवर सही करणं एवढंच त्यांचं काम आहे, अशी बोचरी टीका लोंढे यांनी केली.

'अमूल'साठी महानंदचा बळी

महाराष्ट्रात सहकार क्षेत्रानं समृद्धी आणली, ग्रामीण भागात या सहकारानं आर्थिक प्रगती केली, पण याच सहकारावर आता मोदी-शहांची वक्रदृष्टी पडली आहे. महानंदचा कारभार राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाकडं देण्याचा ठराव झाला आहे. दुग्ध व्यवसायात महाराष्ट्रातील महानंद, गोकूळ, वारणा, चितळे या सारख्या असंख्य संस्थांचे मोठे जाळे आहे. ग्रामीण भागात दूग्ध व्यवसाय हा शेतीला पूरक व्यवसाय आहे व सहकारच्या माध्यमातून मोठी क्रांती झालेली आहे पण गुजरातच्या ‘अमूल’साठी महानंदचा बळी दिला जात आहे, असा आरोप त्यांनी केला.

Ram Mandir : राहुल गांधींना राम मंदिर उद्घाटन सोहळ्याचं आमंत्रण का नाही? हे आहे कारण

आता शिंदे म्हणतील की…

'राज्यातील महत्वाचे प्रकल्प गुजरातला पळवून नेले जात आहेत. शिंदे सरकार आता गुजरातला महानंद गेलाच नाही किंवा मोदीजी यापेक्षा मोठा प्रकल्प महाराष्ट्राला देणार आहेत अशी तकलादू उत्तरे देऊन दिशाभूल करतील. मोदी-शहांनी आता शिंदे, फडणवीस व अजित पवारांनाच गुजरातला घेऊन जावं, असा टोलाही अतुल लोंढे यांनी हाणला आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर