मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  JNIBF : पंडित नेहरु यांचं नाव असलेल्या संस्थेचं नामांतर का?; काँग्रेसनं सांगितलं कारण
JNIBF
JNIBF

JNIBF : पंडित नेहरु यांचं नाव असलेल्या संस्थेचं नामांतर का?; काँग्रेसनं सांगितलं कारण

26 May 2023, 20:13 ISTGanesh Pandurang Kadam

jawaharlal nehru institute of banking and finance : देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरु यांच्या नावे हैदराबादेत असलेल्या संस्थेचं नाव बदलण्याच्या निर्णयावर काँग्रेसनं तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.

jawaharlal nehru institute of banking and finance : हैदराबादमधील जवाहरलाल नेहरु इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग अँड फायनान्स या संस्थेचं नाव बदलून IDBI प्रशिक्षण महाविद्यालय करण्यात आल्यानं काँग्रेस संतापली आहे. पंडित नेहरु यांच्याबद्दलच्या घृणेतूनच भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं हा आटापिटा चालवला आहे. मात्र, अशा कोत्या मनोवृत्तीनं नेहरुंचं नाव पुसलं जाणार नाही, उलट ते आणखी गडद होत जाईल, असं काँग्रेसनं म्हटलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी या संदर्भात एक पत्रक प्रसिद्धीस दिलं आहे. त्यातून त्यांनी भाजपवर टीकेची तोफ डागली आहे. भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला पंडित जवाहरलाल नेहरु यांच्याबद्दल अत्यंत घृणा आहे. नेहरु नावाची अ‍ॅलर्जीच त्यांना जडलेली आहे म्हणून नेहरुंची सातत्यानं बदनामी केली जात आहे. पंडित नेहरु यांचं नामोनिशान मिटवण्यासाठी त्यांचा आटापिटा सुरू आहे. त्याच विकृत मानसिकतेतून हैदराबादमधील जवाहरलाल नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग अँड फायनान्स या संस्थेचं नाव बदलण्यात आलंय, अशी बोचरी टीका अतुल लोंढे यांनी केली आहे.

75 Rupee Coin : दोन हजारच्या नोटबंदीनंतर आता येणार ७५ रुपयांचं नाणं, संसदेच्या उद्घाटन सोहळ्याचा मुहूर्त

पंडित नेहरु यांचं भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील योगदान मोठं आहे. स्वातंत्र्यानंतर देशाला ताठ मानेनं एक समृद्ध राष्ट्र म्हणून जगात उभं करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. भाजप व संघाच्या देश तोडणाऱ्या विचारधारेला पंडित नेहरुंच्या आधुनिक विचारानं मोठी चपराक दिली आहे. त्यामुळंच नेहरु हे या दोन्ही संस्थांच्या निशाण्यावरच असतात. नेहरुंचं योगदान नाकारण्यासाठी बदनामी मोहीम राबवली जात आहे. भाजप व संघानं कितीही प्रयत्न केला तरी या देशाच्या विकासात मैलाचे दगड ठरलेल्या संस्था आजही दिमाखदारपणे उभ्या आहेत. एखाद्या संस्थेचं नाव बदलल्यानं पंडित नेहरुंचं महत्व कमी होत नाही, असं लोंढे यांनी सुनावलं आहे.

'भाजप सरकारनं कोणतंही नावलौकिक मिळवणारं काम केलेलं नाही. नाव घ्यावं असा एकही महापुरुष नाही त्यांच्याकडं नसल्यानंच पंडित नेहरुंसारख्या जागतिक कीर्तीच्या नेत्याचं महत्त्व कमी करण्याचा केविलवाणा प्रयत्न ते करत आहेत. केवळ नाव बदलणं हेच काम भाजप सरकार करत आहे, अशी खोचक टीकाही त्यांनी केली.