राज्यात विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असून अधिवेशनाचा सध्या दुसरा आठवडा सुरू आहे. विधानसभा आणि विधान परिषदेत सत्ताधारी आणि विरोधक आक्रमक झाले असून आज रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांवर विधानसभेत जोरदार चर्चा झाली. दोन्ही सभागृहांचे कामकाजाचे थेट प्रक्षेपण होत असल्याने सभागृहातील प्रत्येक हालचाल कॅमेऱ्यात टिपली जात आहे. याच कॅमेऱ्यात कैद झालेले एक दृश्य महाराष्ट्र काँग्रेसने त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केले आहे.
काँग्रेसने ट्विट केलेला व्हिडिओ सोमवारी झालेल्या कामकाजाचा आहे. विधान परिषदेत राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई निवेदन करत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सहकुटुंब भेत घेतल्यानंतर मोदींनी शिंदेंबाबत कौतुक करत ट्वीट केले होते. या ट्वीटची शंभूराज देसाई सभागृहाला माहिती देत होते. शंभूराज देसाई यांच्या मागेच अल्पसंख्याक विकास विभागाचे मंत्री अब्दुल सत्तार बसले आहेत. अब्दुल सत्तार एक पुडी बाहेर काढतात आणि तोंडात टाकतात, असं काँग्रसने ट्वीट केलेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे.
हा व्हिडिओ शेअर करताना महाराष्ट्र काँग्रेसकडून टीका करण्यात आली आहे. “विधानसभेत चर्चा सुरू असताना सत्तार महोदयांनी थेट पुडी काढून तोंडात टाकली आणि निर्धास्तपणे चघळत बसले. आज विधानसभेत पुडी खाऊन चघळतायत, उद्या तिथे थुंकायलाही कमी करणार नाहीत. शिंदे-फडणवीस सरकारच्या आमदारांना विधानसभा पानाची टपरी वाटते का?”, असं ट्वीट काँग्रेसने केलं आहे.