Maha Vikas Aghadi : लोकसभा निवडणुकीचं जागावाटप ठरलेलं नाही; काँग्रेसनं फेटाळली चर्चा
Congress on MVA Lok Sabha Election Seat Sharing : लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा जागावाटपाचा कुठलाही फॉर्मुला ठरलेला नाही, असं काँग्रेसनं स्पष्ट केलं आहे.
Atul Londhe on MVA Lok Sabha Election Seat Sharing : आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील तिन्ही प्रमुख पक्षांचा जागावाटपाचा फॉर्मुला ठरल्याची चर्चा काँग्रेसनं स्पष्ट शब्दांत फेटाळून लावली आहे. असा कुठलाही फॉर्मुला ठरलेला नाही. या संदर्भातील बातम्या पूर्णपणे चुकीच्या आहेत, असं काँग्रेसनं म्हटलं आहे.
ट्रेंडिंग न्यूज
महाविकास आघाडीच्या नेत्यांची संयुक्त बैठक बुधवारी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये झाली. या बैठकीत एप्रिल व मे महिन्यात एकत्रित जाहीर सभा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी सर्व पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं. आघाडीच्या सर्व सभा यशस्वी व्हाव्यात यासाठी सर्वच घटक पक्षांनी झोकून देऊन काम करावं, असं आवाहन यावेळी करण्यात आलं. पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी यासाठी तयारीला लागावं, अशा सूचनाही देण्यात आल्या.
या बैठकीनंतर महाविकास आघाडीचा लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपांचा फॉर्मुला ठरल्याची चर्चा सुरू झाली होती. त्यानुसार, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला २१, राष्ट्रवादी काँग्रेसला १९ व काँग्रेसला ८ जागा असं वाटप झाल्याचं बोललं जात होतं. काँग्रेस इतक्या कमी जागांवर तयार कशी झाली याबद्दल त्यामुळं कुजबुज सुरू झाली होती. मात्र, काँग्रेसनंच आता याबाबत खुलासा केला आहे.
'लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा जागावाटपाचा कुठलाही फॉर्मुला ठरलेला नाही. आघाडीच्या कार्यकर्त्यांची व जिल्हाध्यक्षांची एकत्रित बैठक झाली. यापुढच्या निवडणुका महाविकास आघाडी म्हणून लढण्याचा निर्णय घेण्यात आला. कोण किती जागा लढेल, याबाबत काहीही ठरलेलं नाही. या संदर्भातील बातम्या चुकीच्या आहेत. याचं आम्ही खंडन करतो, असं महाराष्ट्र काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी स्पष्ट केलं आहे.