मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  दावोसला जाऊन एकनाथ शिंदेंनी महाराष्ट्राला फसवलं; कंपन्यांची नावं व पत्ते जाहीर करत काँग्रेसचा आरोप

दावोसला जाऊन एकनाथ शिंदेंनी महाराष्ट्राला फसवलं; कंपन्यांची नावं व पत्ते जाहीर करत काँग्रेसचा आरोप

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Jan 20, 2023 04:59 PM IST

Congress targets Eknath Shinde Over Davos MOU : दावोसमध्ये जाऊन लाखोंची गुंतवणूक आणण्याचा दावा करणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राची फसवणूक केली आहे, असा आरोप काँग्रेसनं केला आहे.

Davos World Economic Forum (File Photo)
Davos World Economic Forum (File Photo)

Eknath Shinde Davos Visit : दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत सहभागी होऊन महाराष्ट्रासाठी लाखो कोटींची गुंतवणूक आणल्याचा दावा करणाऱ्या शिंदे-फडणवीस सरकारची काँग्रेसनं पोलखोल केली आहे. ज्या कंपन्यांशी १ लाख ३७ हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार केल्याचं सरकार सांगत आहे, त्या महाराष्ट्रातीलच आहेत, असा दावा काँग्रेसनं केला आहे.

काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी या कंपन्यांची नावं आणि पत्तेही जाहीर केले आहेत. शिंदे सरकारची ही बनवाबनवी उघड आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. शिंदे सरकारनं करार केलेल्या कंपन्यांतील यादीमध्ये औरंगाबाद, जालना व चंद्रपूर जिल्ह्यातील तीन कंपन्या आहेत. न्यु एज क्लिनटेक सोल्युशन कंपनी ही औरंगाबादची आहे. फेरा अलॉय प्रा, ली. ही कंपनी जालना मधील आहे तर राजुरी स्टिल अँड अलॉय इंडिया ही कंपनी चंद्रपूरची आहे. मात्र, या कंपन्या अमेरिका, इंग्लंड व इस्रायलमधील असल्याचं भासवलं गेलं आहे. अशा आणखीही काही कंपन्या असू शकतात. मीडियातही या संदर्भातील बातम्या आहेत, याकडं लोंढे यांनी लक्ष वेधलं आहे.

दावोसला जायची गरज काय होती?

'भद्रावती इथं २० हजार कोटी रुपये गुंतवणुकीचा कोळसा गॅसिफिकेशन प्रकल्प उभारण्यासाठी अमेरिकेच्या न्यू एरा क्लिनटेक सोल्युशन कंपनीनं सामंजस्य करार केल्याचं दाखवलं असून मुख्यमंत्र्यांच्या बाजूला उभे राहून MOU ची कॉपी दाखवणारा व्यक्ती गेल्या सहा-सात वर्षांपासून रोज मंत्रालयात असतो, मग करार करण्यासाठी दावोसला जायची काय गरज? इथंच मुंबईत करार करायला काही अडचण होती का?, असा सवाल त्यांनी केला आहे.

वेदांता-फॉक्सकॉसह अनेक प्रकल्प राज्याबाहेर गेल्यानं राज्यातील जनतेमध्ये संताप आहे. पंतप्रधान मोदी महाराष्ट्राला जो मोठा प्रकल्प देणार होते, तो अद्यापही महाराष्ट्रात आला नाही. महाराष्ट्राच्या जनतेची नाराजी दूर करून आपण मोठी गुंतवणूक आणली हे दाखवण्याच्या नादात शिंदे सरकारनं महाराष्ट्राची घोर फसवणूक केली आहे, असं लोंढे म्हणाले.

IPL_Entry_Point