Congress Formula for Lok Sabha Seat Sharing : आगामी लोकसभा निवडणुकांसाठी सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. सत्ताधारी व विरोधी आघाडीतील पक्षांमध्ये जागावाटपावरून सध्या जोरदार रस्सीखेच सुरू आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं लोकसभेच्या २३ जागा लढण्याचा निर्धार व्यक्त केला असताना काँग्रेसनं नवा फॉर्मुला पुढं करत २१ जागांवर दावा केला आहे. शिवसेना व शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस याला कसा प्रतिसाद देतात ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.
केंद्रातील सत्ताधारी भाजपच्या विरोधात एकत्र आलेल्या इंडिया आघाडीतील पक्षांमध्ये जागावाटपावरून मोठा पेच आहे. महाराष्ट्रातील तीनही प्रमुख पक्ष जास्तीत जास्त जागांवर दावा करत आहेत. प्रत्येक पक्ष आपापल्या सोयीचा फॉर्मुला पुढं करत आहे. ठाकरेंच्या शिवसेनेनं पूर्वीपासूनच्या २३ जागांवर दावा ठोकला आहे. तर, प्रकाश आंबेडकरांनी १२-१२-१२-१२ हा फॉर्मुला सांगितला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं अद्याप जाहीर भाष्य केलेलं नसलं तरी काँग्रेसनं नवा फॉर्मुला पुढं ठेवला असल्याचं सूत्रांकडून समजतं.
काँग्रेस पक्षानं जागावाटपावर निर्णय घेण्यासाठी नेमलेल्या राज्यातील समितीनं २२-१८-६-२ असा फॉर्मुला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडं पाठवला आहे. काँग्रेसला २२, शिवसेना १८, पवारांच्या राष्ट्रवादीला ६ आणि वंचित बहुजन आघाडीला २ जागा द्याव्यात, असं सुचवण्यात आलं आहे.
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली असल्यानं त्या पक्षांची ताकद खूपच कमी झाली आहे. काँग्रेस एकसंध आहे. तसंच, राज्यात आता काँग्रेस हाच मोठा पक्ष आहे. त्यामुळं जागावाटपात काँग्रेसला झुकतं माप मिळायला हवं, अशी काँग्रेस नेत्याचं म्हणणं आहे.
शिवसेनेनं काँग्रेसच्या या दाव्याची खिल्ली उडवली आहे. महाराष्ट्रात काँग्रेसकडं नेताच नाही. आम्ही थेट दिल्लीतील नेत्यांशीच चर्चा करत आहोत. शिवसेनेनं आजपर्यंत २३ जागा लढवत आली आहे. यापुढंही तेवढ्याच जागा लढणार, असं संजय राऊत यांनी आधीच स्पष्ट केलं आहे. त्यामुळं काँग्रेसचा नवा फॉर्मुला कितपत मान्य होईल याबद्दल साशंकता आहे.
संबंधित बातम्या