Nana Patole On Maharashtra CM Post : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्यापासून राज्याचा मुख्यमंत्री बदलणार असल्याची चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील अपात्रतेची याचिका निकाली लागल्यानंतर राज्यातील राजकीय समीकरणं बदलणार असल्याचं बोललं जात आहे. त्यातच आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. कार्यकर्त्यांनी मी मुख्यमंत्री व्हावं अशी कार्यकर्त्यांची इच्छा असेल तर ती पूर्ण होवो, अशा वक्तव्य करत नाना पटोले यांनी नव्या चर्चांना तोंड फोडलं आहे. त्यामुळं काँग्रेसमधील नेत्यांमध्ये सुप्त संघर्ष सुरू असल्याचं बोललं जात आहे. अजित पवार सत्तेत सामील झाल्यानंतर काँग्रेस राज्यात एकमेव मोठा विरोधी पक्ष ठरत आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील भद्रा मारुती देवस्थानचं दर्शन घेतलं. यावेळी माध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले, हिंदू धर्मियांसाठी महत्त्वपूर्ण असलेला श्रावण महिना सध्या सुरू आहे. त्यामुळं आम्ही कुणासारखा दिखावा करत नाही. मी काँग्रेसमध्ये काम करत असल्याने आमचा पक्ष कुणाच्याही धार्मिक भावना दुखावत नाही. जे देव सर्वधर्मियांचे प्रतीक आहे, त्यांचं दर्शन घेण्यासाठी नेहमीच जात असल्याचं नाना पटोले यांनी सांगितलं आहे. याशिवाय पटोले यांना मुख्यंमत्रीपदाबाबत पत्रकारांनी विचारलं असता, मी मुख्यमंत्री व्हावं अशी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची इच्छा असेल तर ती पूर्ण व्हायला हवी, असं म्हणत नाना पटोलेंनी नव्या चर्चांना तोंड फोडलं आहे.
नाना पटोले यांनी खुलताबादेतील वेरुळ, घृष्णेश्वर, भद्रा मारुतीचं दर्शन घेतलं आहे. याशिवाय नाना पटोले यांनी जर-जरी बक्ष यांच्या दर्ग्याचं दर्शन घेत चादर चढवली. त्यामुळं त्यांनी सर्वधर्मियांना भेट दिल्याने चर्चा सुरू झाल्या आहे. राष्ट्रवादीतील फूटीवर बोलताना पटोले म्हणाले की, राष्ट्रवादी पक्षात काय सुरू आहे, हे बघणं आमचं काम नाहीय. आम्हाला सध्या जनतेची काळजी वाटत आहे. घरातला बाप हा बापच असतो, मुलाने काहीही गडबग केली तरी त्याला काही फरक पडत नाही, असं म्हणत नाना पटोलेंनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जोरदार टोला हाणला आहे.
संबंधित बातम्या