Jan Sanvad Yatra : काँग्रेसची तीन सप्टेंबरपासून जनसंवाद यात्रा; लोकसभेपूर्वी महाराष्ट्र पिंजून काढणार
Jan Sanvad Yatra Maharashtra : लोकसभा-विधानसभा निवडणुकीला काही महिने उरलेले असताना काँग्रेसकडून राज्यभर यात्रा काढण्यात येणार आहे.
Maharashtra Congress Jan Sanvad Yatra : काँग्रेसच्या नेतृत्वाखाली देशातील २६ प्रमुख विरोधी पक्षांनी एकत्र येत इंडिया आघाडी स्थापन केली आहे. शिमला, बंगळुरू या शहरांनंतर मुंबईत इंडिया आघाडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यानंतर आता महाराष्ट्र काँग्रेसकडून राज्यभरात जनसंवाद यात्रेचं आयोजन करण्यात आल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, काँग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी पत्रकार परिषद घेत जनसंवाद यात्रेची घोषणा केली आहे.
ट्रेंडिंग न्यूज
आगामी लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने महाराष्ट्र काँग्रेसकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. त्यासाठी काँग्रेसने जनसंवाद यात्रेची घोषणा केली आहे. येत्या तीन सप्टेंबरपासून राज्यात जनसंवाद यात्रा सुरू केली जाणार असून त्यात भाजप सरकारचा भ्रष्ट कारभार, महागाई, बेरोजगारी, शेतकरी प्रश्न आणि अन्य मुद्द्यांवर रान उठवलं जाणार आहे. त्यामुळं आता काँग्रेस आणि भाजपमध्ये यावरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडण्याची शक्यता आहे. विभागवार यात्रेचं नियोजन करण्यात आलं असून वेगवेगळ्या नेत्यांवर जबाबदारी देण्यात आली आहे.
पश्चिम महाराष्ट्रात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उत्तर महाराष्ट्रात जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात, मराठवाड्यात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, विदर्भात नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाखाली यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. कोकणात काँग्रेसचे सर्व नेते दोन दिवस एकत्र येणार असून महिनाभर संपूर्ण राज्यात काँग्रेसकडून यात्रेद्वारे लोकांची संपर्क साधला जाणार असल्याचं काँग्रेस नेत्यांकडून सांगण्यात आलं आहे. जनसंवाद यात्रेच्या निमित्ताने आम्ही लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. येत्या निवडणुकीत आम्हाला सर्वाधिक जागा मिळणार असल्याचा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे.