कॉंग्रेस पक्षाने आज महाराष्ट्रातील २३ उमेदवारांच्या नावाचा समावेश असलेली दुसरी उमेदवार यादी जाहीर केली. या यादीत काही ठिकाणी कॉंग्रेसच्या विद्यमान आमदारांना तिकीट मिळाले असून असून काही जागांवर माजी आमदारांच्या नातेवाईकांच्या नावाचा यादीत समावेश आहे.
नागपूर जिल्ह्यातील सावनेर मतदारसंघातून कॉंग्रेसचे विद्यमान आमदार, माजी मंत्री सुनील केदार यांच्या ऐवजी त्यांच्या पत्नी अनुजा केदार यांना तिकीट देण्यात आले आहे. सुनील केदार यांना शिक्षा जाहीर झाल्यामुळे निवडणूक लढता येणार नाही.यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी (एसटी) मतदारसंघातून माजी आमदार, माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांचे पुत्र जितेंद्र मोघे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
वर्धा मतदारसंघातून विधानसभेचे माजी उपाध्यक्ष दिवंगत प्रमोद शेंडे यांचे पुत्र शेखर शेंडे यांना पुन्हा उमेदवारी जाहीर केली आहे. २०१९ च्या निवडणुकीत या मतदारसंघात भाजपचे पंकज भोयर यांनी शेखर शेंडे यांचा ७ हजार मतांनी पराभव केला होता.
अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर (एससी) मतदारसंघातून विद्यमान आमदार लहू कानडे यांचे तिकीट कापून त्यांच्याऐवजी हेमंत ओगले यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ओगले हे ससाने गटाचे मानले जातात.
गोंदिया जिल्ह्यातील आमगाव -देवरी (एसटी) या मतदारसंघातून विद्यमान आमदार सहसराम कोरेटी यांचे तिकीट कापण्यात आले आहे. या मतदारसंघातून सेवानिवृत्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार पुराम यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे कोरेटे हे पक्षाच्या उमेदवारासोबत राहतात की अपक्ष रिंगणात उतरतात याकडे लक्ष लागले आहे.
१) भुसावळ (एससी) - डॉ. राजेंद्र मनवटकर
२) जळगाव जामोद -डॉ. स्वाती वाकेकर
३) अकोट- महेश गंगणे
४) वर्धा - शेखर शेंडे
५) सावनेर - अनुजा केदार
६) नागपूर (दक्षिण) - गिरीश पांडव
७) कामठी- सुरेश भोयर
८) भंडारा (एससी)- पूजा ठवकार
९) अर्जुनी मोरगाव (एससी) - दिलीप बनसोड
१०) आमगाव (एसटी) - राजकुमार पुरम
११) राळेगाव- प्रा. वसंत पुरके
१२) यवतमाळ - बाळासाहेब मांगुळकर
१३) आर्णी (एसटी)- जितेंद्र मोघे
१४) उमरखेड (एससी) - साहेबराव कांबळे
१५) जालना - कैलास गोरंट्याल
१६) औरंगाबाद (पूर्व) - मधुकर देशमुख
१७) वसई- विजय पाटील
१८) कांदिवली (पूर्व) - काळू भदेलिया
१९) चारकोप- यशवंत सिंह
२०) सायन कोळिवाडा- गणेश यादव
२१) श्रीरामपूर (एससी) - हेमंत ओगले
२२) निलंगा- अभयकुमार साळुंखे
२३) शिरोळ -गणपतराव पाटील