मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  मनुस्मृतीचा शालेय अभ्यासक्रमात समावेश? बहुजन विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा भाजप-संघाचा प्रयत्न

मनुस्मृतीचा शालेय अभ्यासक्रमात समावेश? बहुजन विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा भाजप-संघाचा प्रयत्न

May 24, 2024 06:28 PM IST

Manushruti in School Education: महाराष्ट्राच्या शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा धड्याचा समावेश करण्याच्या निर्णयाला कॉंग्रेस पक्षाने तीव्र विरोध दर्शवला आहे.

शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा समावेश करण्याला कॉंग्रेसचा तीव्र विरोध
शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा समावेश करण्याला कॉंग्रेसचा तीव्र विरोध

महाराष्ट्रात शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा पाठ घुसवून भाजपा सरकार जुने, बुरसटलेले विचार व वर्णभेदाला पुरस्कृत करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप कॉंग्रेसने केला आहे. भाजपाला देशाच्या भवितव्याची चिंता नसून मनुवादी विचारांच्या ऱ्हासाची चिंता आहे. म्हणूनच शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा समावेश करण्याचा घाट घालण्यात आला आहे, असा आरोप मुंबई प्रदेश कॉंग्रेसच्या अध्यक्ष, माजी शालेय शिक्षण मंत्री, आमदार प्रा. वर्षा गायकवाड यांनी केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

राज्याचा शालेय अभ्यासक्रम आराखडा (SCERT) नुकताच जाहीर करण्यात आला आहे. यात मनुस्मृतीचा समावेश करण्यात आला आहे. हा प्रकार मनुची विभाजनकारी मूल्ये विद्यार्थ्यांच्या निरागस मनावर लादण्याच्या डाव असून काँग्रेस पक्षाचा याला तीव्र विरोध असल्याचे गायकवाड यांनी सांगितले. अभ्यासक्रम आराखड्यातून हा आक्षेपार्ह भाग काढा अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा गायकवाड यांनी दिला आहे.

प्रा. गायकवाड पुढे म्हणाल्या की, भाजपा-आरएसएस देशाची घटना बदलून देशात मनुस्मृती लागू करू पाहत आहेत हे उघड आहे. लोकसभेत ४०० जागांच्या बहुमतासह सत्ता मिळाली की डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान बदलणार अशी जाहीर भाषा भाजपच्या नेत्यांनी केली आहे. आता नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार जाहीर झालेला महाराष्ट्र राज्याच्या शालेय अभ्यासक्रम आराखड्यात (एससीएफ) मूल्ये आणि स्वभाववृत्ती या घटकाची सुरुवात मनुस्मृतीतील श्लोकाने करण्यात आली आहे. मनूस्मृतीमुळे वर्णव्यवस्था निर्माण केली, बहुजन समाजाला शिक्षणापासून वंचित ठेवण्याचे पाप केले, मनूस्मृतीमध्ये महिलांना समाजात दुय्यम स्थान देण्यात आले आहे असल्याचे गायकवाड म्हणाल्या. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीला आपल्या हातांनी जाळले होते. त्याच मनुस्मृतीचा अभ्यास शाळकरी विद्यार्थांनी करायचा का, असा सवाल वर्षा गायकवाड यांनी केला आहे.

विद्यार्थ्यांच्या मनावर घटनेतील व्यापक मूलतत्त्वे, सर्वसमावेशकता कोरली जावीत यासाठी पूर्वीच्या महाविकास आघाडी सरकारने संवैधानिक शिक्षण अधिक व्यापकपणे शालेय शिक्षणात अंतर्भूत करावे याकरिता प्रक्रिया सुरू केली होती. पण मनुवादी सरकारने ती प्रक्रिया थांबवली. आता ते मनुची विभाजनकारी मूल्ये विद्यार्थ्यांच्या निरागस मनावर लादण्याच्या तयारीत आहेत. याचा अर्थ स्पष्ट आहे की भाजपाला संविधान बाजूला सारून देशात मनुस्मृती लागू करायची आहे. सरकारच्या या समाजविरोधी, संविधानविरोधी, विद्यार्थी विरोधी निर्णयाचा काँग्रेस पक्ष तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करत असल्याचे प्रा. वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

टी-२० वर्ल्डकप २०२४