अर्ज माघारी घेण्याच्या अंतिम दिवशी कोल्हापूर उत्तर मतदारसंघात जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळाला. काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार मधुरिमाराजे छत्रपती यांनी अंतिम क्षणी काँग्रेसला धक्का देत आपला उमेदवारी अर्ज माघार घेतला. राजेश लाटकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अनेक पदाधिकारी व नगरसेवकांनी नाराजी व्यक्त करत सतेज पाटलांकडे उमेदवार बदलण्याबाबत पत्र दिले होते. त्यानंतर सतेज पाटील यांनी सूत्रे फिरवून लाटकर यांच्याऐवजी मधुरिमाराजे यांना उमेदवारी मिळवून दिली. मात्र उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या अंतिम काही मिनिटांत मधुरीमाराजे यांनी माघार घेतल्याने काँग्रेस पक्ष निवडणुकीच्या आधीच चितपट झाला व सतेज पाटील तोंडघशी पडले.
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार जयश्री जाधव यांची उमेदवारी कापून काँग्रेसने नवीन चेहरा असलेल्या राजेश लाटकर यांना उमेदवारी दिली होती. मात्र पक्षातील वरिष्ठांनी लाटकर यांची उमेदवारी रद्द करून मधुरिमाराजे छत्रपती यांना उमेदवारी जाहीर केली. पक्षाने त्यांना एबी फॉर्म देऊन त्यांचा उमेदवारी अर्जही भरला गेला. दरम्यानच्या काळात राजेश लाटकर प्रचंड नाराज होते. त्यांनी काँग्रेसवर आरोप केले. लाटकर हे पक्षातील महत्त्वाचे पदाधिकारी आहेत. त्यांची नाराजी पक्षाला परवडणार नाही, असे सांगून मधुरीमाराजे यांनी अर्ज माघार घेण्याचा निर्णय घेतला, असे खासदार शाहू छत्रपती यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
या सर्व नाट्यमय घडामोडीनंतर काँग्रेस प्रदेश कार्यकारिणीने मोठा निर्णय घेतला. मधुरिमाराजे यांच्या अर्ज माघारीनंतर आता कोल्हापूर उत्तरमध्ये शिंदेसेनेचे राजेश क्षीरसागर विरुद्ध बंडखोर राजेश लाटकर यांच्यात लढत होणार आहे. मधुरिमाराजे यांनी माघार घेतल्याने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोठा निर्णय घेतला आहे. महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार रिंगणात नसला तरी राजेश लाटकर यांना पाठिंबा देऊन आम्ही त्यांना निवडून आणू, असे नाना पटोले यांनी सांगितले. मविआचा अधिकृत उमेदवारच रिंगणात नसल्याने राजेश लाटकर यांना पाठिंबा देण्यावाचून काँग्रेसकडे दुसरा काही पर्याय नव्हता.
मधुरिमाराजे यांनी अर्ज माघार घेतल्यानंतर सतेज पाटील म्हणाले की, माझी फसवणूक केल्यासारखं आहे हे. मग आधीच निर्णय घ्यायचा होता नाही म्हणून. आम्हाला काय अडचण नव्हती हे चुकीचे आहे महाराज, हे बरोबर नाही. मला तोंडघशी पाडायची काय गरज होती, असे म्हणत खासदार शाहू छत्रपती यांच्यावर सतेज पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच जेवढ्यांनी ही आग लागली तेवढ्या सगळ्यांना सांगतो, लक्षात ठेवा. दम नव्हता तर उभारायचं नव्हतं, मी पण दाखवली असती माझी ताकद असा संताप व्यक्त करत सतेज पाटील जिल्हाधिकारी कार्यालयातून निघून गेले.