‘अक्षय शिंदेचा एन्काऊंटर खरा की खोटा?’ माजी मंत्र्यांने उपस्थित केला प्रश्न-congress leaders raises doubt over akshay shinde police encounter ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  ‘अक्षय शिंदेचा एन्काऊंटर खरा की खोटा?’ माजी मंत्र्यांने उपस्थित केला प्रश्न

‘अक्षय शिंदेचा एन्काऊंटर खरा की खोटा?’ माजी मंत्र्यांने उपस्थित केला प्रश्न

Sep 23, 2024 09:45 PM IST

akshay shinde encounter - पोलिसांनी केलेलं अक्षय शिंदेचं एन्काउंटर वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. अक्षय शिंदे याचं एन्काउंटर खरं की खोटं, असा सवाल कॉंग्रेस पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केला आहे.

अक्षय शिंदेचा एन्काउंटर खरा की खोटाः कॉंग्रेस नेत्याचा सवाल
अक्षय शिंदेचा एन्काउंटर खरा की खोटाः कॉंग्रेस नेत्याचा सवाल

बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाला आहे. अक्षय शिंदे याने पोलिसांकडून बंदूक हिसकावून गोळी झाडली. त्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ गोळीबार केला. त्यात अक्षय शिंदे याचा मृत्यू झाला असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांना दिली. परंतु आता पोलिसांनी केलेलं हे एन्काउंटर वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. अक्षय शिंदे याचं एन्काउंटर खरं की खोटं, असा सवाल कॉंग्रेस पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी उपस्थित केला आहे. थोरात यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. बाळासाहेब थोरात लिहितात, ‘बदलापूर अत्याचार प्रकरणातील नराधम आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाला. मात्र या प्रकरणाच्या निमित्ताने राज्याच्या कायदा सुव्यवस्थेवर काही प्रश्न निर्माण झाले आहेत. अक्षय शिंदेचा एन्काऊंटर खरा की खोटा? पोलीस कोणाला वाचवण्याचा प्रयत्न तर करत नाही ना? बदलापूर घटनेतील सूत्रधार मोकाट सुटणार तर नाही ना? शाळेच्या विश्वस्तांना क्लीनचीट तर मिळणार नाही ना?’ असे अनेक प्रश्न बाळासाहेब थोरात यांनी आपल्या ट्विटमधून उपस्थित केले आहे.

एन्काउंटरची न्यायालयीन चौकशी कराः विजय वडेट्टीवार

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीसुद्धा आरोपी अक्षय शिंदे याच्या एन्काउंटवर प्रश्न उपस्थित केले आहे. या एन्काउंटरची न्यायालयीन चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे. आरोपी अक्षय शिंदे याने गोळी झाडून घेणे म्हणजे पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का? अक्षय शिंदे याने गोळी नेमकी कशी झाडली? आरोपी अक्षय पोलिसांच्या ताब्यात असताना त्याचे हात बांधले नव्हते का? त्याला बंदूक कशी काय मिळाली? पोलिस इतके बेसावध कसे असू शकतात?, असा प्रश्न वडेट्टीवार यांनी केला आहे.

बदलापूर प्रकरणात एकीकडे संस्थाचालक भाजपशी सबंधित असताना संस्थाचालकांवर कारवाई होत नाही, दुसरीकडे आज आरोपी अक्षय शिंदे स्वतःवर गोळी घालून घेतो हे अतिशय धक्कादायक आणि संशयास्पद आहे. बदलापूर प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवर आमचा पहिल्यापासून विश्वास नाही. आमची मागणी आहे, आता या प्रकरणाची न्यायिक चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

स्वसंरक्षण की हत्या?- खासदार वर्षा गायकवाड यांचा सवाल

मुंबई प्रदेश कॉंग्रेसच्या अध्यक्ष आणि उत्तर-मध्य मुंबईच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी बदलापूर येथील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या एन्काउंटवर प्रश्न उपस्थित केले आहे. एखाद्या हायप्रोफाईल प्रकरणातील आरोपीला ट्रान्झिट रिमांडसाठी घेऊन जात असताना सहसा अनेक पोलिस कर्मचारी बरोबर असतात. पोलिसांच्या गराड्यात असताना बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे पोलिसांचे पिस्तुल हिसकावून पोलिसांवरच गोळ्या झाडतो, यावर कुणाचा विश्वास बसेल? आणि ते जरी घडलं असेल तर पोलिसांनी त्याला आटोक्यात आणून का पकडता आलं नाही? हे संपूर्ण प्रकरण अत्यंत गंभीर आणि संशयास्पद आहे. पोलिस आणि राज्याच्या गृहखात्यात नक्की चाललंय तरी काय?, असा सवाल गायकवाड यांनी केली आहे.

बदलापूर प्रकरणात याआधीच पोलिसांवर प्रकरण दडपण्याचे, गुन्हा नोंदवण्यास उशीर करण्याचे गंभीर आरोप झालेले आहेत. या प्रकरणातील शाळेचे संस्थापक तुषार आपटे यांचे भाजपाशी संबंध असून तो अजूनही फरार आहे. त्याला अजून पोलीस का पकडू शकले नाहीत? आरोपीच्या आईने आणि भावाने दिलेले जबाब कसं दुर्लक्षित करता येतील?, असं वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे.

त्यामुळे जागच्या जागी हे संपूर्ण प्रकरण दडपण्यासाठी आणि या प्रकरणाचे धागे दोरे ज्यांच्या दिशेने जात आहेत त्यांना संरक्षण देण्यासाठी तर अक्षय शिंदेची हत्या करण्यात आलेली नाही ना? याची सीबीआय मार्फत चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी गायकवाड यांनी केली आहे.

राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा तीन तेरा वाजलेत, पण राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री हे सत्ताकारणात व्यग्र आहेत. खरं तर या प्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणीस यांनी राजीनामा दिला पाहिजे, असंही वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे.

Whats_app_banner