Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. या योजनेंतर्गत राज्यातील महिलांना दरमहा १ हजार ५०० रुपये मिळणार आहेत. मात्र, या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार राज्यातील महिलांची दिशाभूल करत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जाहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनीही शिंदे सरकारवर निशाला साधला आहे.
‘राज्यातील महिलांसाठी सरकारने लाडकी बहीण योजना आणून पंधराशे रुपयात महिलांची बोळवण राज्य सरकारने केली आहे. तर, सुशिक्षित तरुणांना मात्र सहा ते बारा हजार रुपये दिले जाणार आहेत. निवडणुकांपूर्वी महिलांची फसवणूक करण्यापेक्षा त्यांना सन्मानजनक रक्कम द्यावी,’ अशी त्यांनी मागणी केली आहे.
‘राज्य सरकारने राज्यातील महिलांसाठी नुकतीच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली आहे.या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा पंधराशे रुपये देण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. तर आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज्यातील सुशिक्षित तरुणांना कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत दरमहा सहा ते बारा हजार रुपये देण्यात येणार आहेत. बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना सहा हजार रुपये कार्य प्रशिक्षणा दरम्यान तर पदविका झालेल्या तरुणांना आठ हजार आणि पदवीधर तरुणांना कार्य प्रशिक्षणादरम्यान दहा हजार रुपये देण्यात येणार आहेत’, असे यशोमती ठाकूर म्हणाल्या.
पुढे यशोमती ठाकूर म्हणाल्या की, ‘एकीकडे लाडक्या भावाला दहा हजार रुपये देण्याचा सरकारने निर्णय घेतला आणि दुसरीकडे लाडक्या बहिणीची मात्र दीड हजार रुपयात फसवणूक केली जात आहे. यामध्ये लाडक्या भावा-बहिणींमध्येच भांडण लावायचा सरकारचा प्रयत्न असल्याचा दिसत आहे. दरम्यान राज्यातील सुशिक्षित महिलांनाही सरकारने लाडक्या भावाच्या योजनेप्रमाणे सन्मानजनक रक्कम दिली पाहिजे. किंवा राज्यातील महिलांना सरसकट पाच हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम सरकारने देऊन महिलांचा सन्मान करावा. राज्यातील महिला भगिनींची जर सरकारला खरोखरच काळजी असेल तर त्यांनी महिलांची दीड हजार रुपयात फसवणूक न करता त्यांना किमान पाच हजार रुपये सन्मानपूर्वक द्यावेत.’
‘आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून महायुती सरकार घोषणांचा पाऊस पाडत आहेत. लाडका भाऊ, लडक्या बहिणीला पैसे देत आहेत’, असे संजय राऊत म्हणाले. तसेच लाडकी बहीण योजनेतील दीड हजारांचा मुद्दा उपस्थित करून संजय राऊत म्हणाले की, ‘लाडका भाऊ योजनेप्रमाणे बहिणीलाही १० हजार रुपये द्या, दीड हजारांत तिचे घर कसे चालणार?’
संबंधित बातम्या