vijay wadettiwar taunt Eknath shinde : विधानसभा निवडणुकीत महायुतीने दणदणीत विजय मिळवत २८८ पैकी २३५ जागा जिंकल्या. त्यानंतर भाजपने मुख्यमंत्रीपदावर दावा ठोकत पुन्हा देवेंद्र फडणवीसांकडे राज्याचे नेतृत्व सोपवले. मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी समारंभात एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर विधीमंडळाच्या विशेष अधिवेशनात नवनिर्वाचित आमदारांना शपथबद्ध करण्यात आले. विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मात्र मंत्रिमंडळाचे खातेवाटप अद्याप झालेले नाही. एकनाथ शिंदे महत्वाच्या खात्यासाठी अडून बसलेले दिसून येत आहेत. यावरून महाविकास आघाडीतील नेते शिंदेसेना व अजित पवार गटावर टीका करत आहेत. आता काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी याबाबत खोचक टोला लगावला आहे.
महाराष्ट्रात अनपेक्षित यश मिळाले. सत्ता अमर्याद झाली आणि ती डोक्यात गेली. तसेच उपमुख्यमंत्री नंबर २ वर कोण आणि नंबर ३ वर कोण, हे मुख्यमंत्री यांनी ठरवावे, असेही वडेट्टीवार म्हणाले.
जे काही होते ते ते पाहा, अशी स्थिती एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची झालेली आहे. जे जे देतील ते ते घ्या, जे जे मिळेल ते ते घ्या, नाही तर तुम्ही घरी आराम करा, असा खोचक टोलाकाँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी लगावला. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याकडे आता अजिबात बार्गेनिंग पॉवर शिल्लक राहिलेली नाही. ते बार्गेनिंग करू शकत नाही, ही स्थिती आताच्या भाजपा सरकारने आणली आहे. ईव्हीएमच्या भरवशावर त्यांनी बरोबर समीकरण जुळवून ठेवलेले आहे. त्यामुळे यांना दुसरा कोणताच पर्याय राहिलेला नाही. बाहेर पडू शकत नाहीत. दोघांची स्थिती धरलं तर चावतंय, सोडलं तर पळतंय, अशी झालेली आहे.
संविधान प्रतिकृतीची विटंबना झाल्याप्रकरणी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी केलेले आंदोलन हिंसक बनले होते. जिल्ह्यात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. या घटनेवर प्रतिक्रिया देताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, सरकारने वेळीच लक्ष घातले असते तर हा प्रसंग टाळता आला असता. परंतु, सरकारने त्या प्रकरणाला गांभीर्याने घेतले नाही. त्यामुळे परभणीत दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आणि त्याला सरकार जबाबदार आहे, असा आरोप वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर केला आहे.
संबंधित बातम्या