मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  'आरक्षण न्यायालयात टिकणार नाही; मराठा समाजाच्या तोंडाला सरकारने पुन्हा पाने पुसली

'आरक्षण न्यायालयात टिकणार नाही; मराठा समाजाच्या तोंडाला सरकारने पुन्हा पाने पुसली

Haaris Rahim Shaikh HT Marathi
Feb 20, 2024 06:09 PM IST

‘सरकारने कितीही ढोल वाजवले, उर बडवले तरी आंदोलनकर्त्यांमध्ये सरकारने फसवल्याची भावना आहे. हे या सरकारचे अपयश आहे. महायुतीचे सरकार हे फसवे सरकार आहे. हे मराठा समाजाच्या आता लक्षात आले आहे: विजय वडेट्टीवार

Congress leader Vijay Wadettiwar slams Mahayuti government on Maratha reservation
Congress leader Vijay Wadettiwar slams Mahayuti government on Maratha reservation

सत्ताधारी महायुती सरकारने विशेष अधिवेशनाचा फार्स करून आज मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात १० टक्के आरक्षण दिलं. हे आरक्षण न्यायालयात टिकणारे नाही. त्यामुळे फसव्या सरकारने मराठा समाजाची पुन्हा फसवणूक केली अशी टिका विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. सरकारचे पितळ उघडे पडेल म्हणून आज सभागृहात विरोधी पक्षाच्या नेत्यांना बोलू दिलं नसल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला. विधीमंडळात आज मराठा आरक्षण विधेयक एकमताने मंजूर करण्यात आले. राज्यपालांच्या स्वाक्षरीनंतर याचे कायद्यात रुंपातर होणार आहे. या विशेष अधिवेशनात मराठा आरक्षण विधेयक सर्वसंमतीने मंजूर करण्यात आले.

वडेट्टीवार म्हणाले. ‘सरकारने कितीही ढोल वाजवले, उर बडवले तरी आंदोलनकर्त्यांमध्ये सरकारने फसवल्याची भावना आहे. हे या सरकारचे अपयश आहे. महायुतीचे सरकार हे फसवे सरकार आहे. हे मराठा समाजाच्या आता लक्षात आले आहे. दोन वेळा न्यायालयात न टिकलेले आरक्षण पुन्हा या महायुती सरकारने दिले आहे. केवळ लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन केलेला फार्स म्हणजे मराठा समाजाच्या तोंडाला पाने पुसल्याचा प्रकार आहे. तेलही नाही आणि तुपही नाही. आमच्या मराठा समाजबांधवांच्या हाती या महायुती सरकारने फक्त धुपाटणे दिले आहे. निवडणुकीच्या तोंडावर केवळ मतं मिळवण्यासाठी सरकारने ही नौटंकी केली आहे.’ अशी प्रतिक्रिया वडेट्टीवार यांनी दिली. राज्यातल्या इतर मागासवर्गीयांच्या (OBC) आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं पाहिजे, अशी काँग्रेस पक्षाची भूमीका असल्याचं वडेट्टीवार म्हणाले.

आज दिलेले १० टक्के आरक्षण कोणत्याही आधाराशिवाय दिले गेले आहे. त्यामुळे हे आरक्षण न्यायालयात टिकणार नाही. या महायुती सरकारमुळे मराठा समाजाचा पुन्हा भ्रमनिरास होणार असल्याचे वडेट्टीवार म्हणाले.

सरकारकडून मराठा समाज आणि शेतकऱ्यांचीही फसगत

महायुतीचे सरकार शेतकऱ्यांची फसगत करणारं फसवं सरकार आहे. बेरोजगार युवक-युवतींची फसगत करणारं फसवं सरकार आहे, अशी टिकाही वडेट्टीवार यांनी केली.

WhatsApp channel

संबंधित बातम्या