मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  भाजप मोठं राजकीय ऑपरेशन करण्याच्या प्रयत्नात; माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा खळबळजनक गौप्यस्फोट

भाजप मोठं राजकीय ऑपरेशन करण्याच्या प्रयत्नात; माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा खळबळजनक गौप्यस्फोट

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Jan 17, 2024 02:53 PM IST

BJP Offer to Sushil Kumar Shinde : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना भाजपनं पक्षप्रवेशाची ऑफर दिल्याचं समोर आलं आहे.

Sushil Kumar Shinde
Sushil Kumar Shinde

Sushil Kumar Shinde News Today : महाराष्ट्रातील दोन प्रमुख पक्षांत फूट पाडून त्यातील प्रमुख नेत्यांना गळाला लावल्यानंतरही भाजपचं राजकीय ऑपरेशन सुरूच आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी भाजपच्या या छुप्या ऑपरेशनची पोलखोल केली आहे. भाजपनं मला व माझी मुलगी आमदार प्रणिती शिंदे हिला दोनदा ऑफर दिल्याचा गौप्यस्फोट सुशीलकुमार शिंदे यांनी केला आहे.

सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या स्नेहमेळाव्यात बोलताना त्यांनी ही धक्कादायक माहिती दिली. 'भारतीय जनता पक्षाचे काही नेते मला आणि प्रणितीला भाजपमध्ये या म्हणून सांगत होते. दोनदा तसा प्रयत्न झाला. पण ते शक्य नाही, असं सुशीलकुमार शिंदे यांनी ठणकावून सांगितलं.

Prakash Ambedkar : काँग्रेसच्या ‘न्याय यात्रे’त राहुल गांधींसोबत प्रकाश आंबेडकरही चालणार, पण एका अटीवर…

‘माझं वय आता ८३ वर्षे आहे. इतकी वर्षे राजकारणात आहे. ज्या आईच्या (काँग्रेस) कुशीत वाढलो, जिथं आमचं बालपण, तरुणपण गेलं. तिला विसरता येणं कसं शक्य आहे? आता या वयात दुसऱ्याशी घरोबा कसा करणार? हे शक्य नाही, असं ते म्हणाले. ’प्रणितीला तुम्ही चांगले ओळखता, ती पक्ष बदलण्याच्या भानगडीत पडणार नाही,' असं शिंदे म्हणाले.

‘राजकारणात हार-जीत होत असते. पंडित जवाहरलाल नेहरू यांनाही पराभव पत्करावा लागला होता. त्या पराभवाचं अत्यंत चांगलं विश्लेषण त्यांनी केलं होतं. ‘लहान मुलाला सुरुवातीला आधार देऊन चालवावं लागतं. नंतर ते स्वत: चालतं. चालताना पडतं, पुन्हा उठतं. पुन्हा पडतं आणि पुन्हा उठतं…. नंतर कधीतरी ते चालायला लागतं आणि एकदा ते चालायला शिकलं की पुन्हा कधी पडत नाही, असं नेहरू म्हणाले होते. 'माणसाला त्रास होतो, पण पुन्हा शक्ती मिळते, हे समजावणारं हे उदाहरण आहे, असं सुशीलकुमार शिंदे म्हणाले.

काँग्रेसला पुन्हा वैभवाचे दिवस येतील!

'तुम्ही काहीही काळजी करू नका. आज वाईट दिवस आहेत, उद्या हे दिवस निघून जातील. आपल्याला पुन्हा वैभवाचे दिवस येतील. याविषयी माझ्या मनामध्ये खात्री आहे. काँग्रेसला लोकांचा पाठिंबा आहे. काँग्रेसलाही वैभवाचे दिवस येतील, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये जोष भरण्याचा प्रयत्न केला.

UBT Press Conference : शिवसेनेबाबत राहुल नार्वेकरांचे निर्णय कसे चुकले? ॲड सरोदेंकडून सविस्तर स्पष्टीकरण

मिशन लोकसभा २०२४

आगामी लोकसभा निवडणुकीत पुन्हा बहुमतानं सत्ता आणण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. भाजपची ही रणनीती हाणून पाडण्यासाठी विरोधकांनी ‘इंडिया’ आघाडी स्थापन केली आहे. काही अपवाद वगळता अनेक विरोधक या आघाडीत एकत्र आले आहेत. विरोधकांनी एकास एक उमेदवार दिल्यास भाजपसाठी निर्विवाद सत्तेची वाट कठीण होऊ शकते, अशी आकडेवारी समोर येत आहे. आकड्यांचं हे गणित नीट जुळवण्यासाठी आता भाजपनं पुन्हा एकदा वजनदार नेत्यांना लक्ष्य केल्याचं बोललं जात आहे. शिवसेना व राष्ट्रवादीनंतर आता भाजपनं काँग्रेसकडं मोर्चा वळवल्याचं सुशीलकुमार शिंदे यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट झालं आहे.

WhatsApp channel