मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sunil Kedar : कर्मचाऱ्यांना मारहाणीचं प्रकरण भोवलं; काँग्रेस नेते सुनील केदारांना एक वर्षाची शिक्षा

Sunil Kedar : कर्मचाऱ्यांना मारहाणीचं प्रकरण भोवलं; काँग्रेस नेते सुनील केदारांना एक वर्षाची शिक्षा

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Jan 13, 2023 04:25 PM IST

Nagpur District Court : पाच वर्षांपूर्वी आमदार सुनील केदार यांनी एका सरकारी कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली होती. त्यानंतर आता कोर्टानं केदार यांना एक वर्षाची शिक्षा सुनावली आहे.

Congress MLA Sunil Kedar
Congress MLA Sunil Kedar (HT)

Congress MLA Sunil Kedar : सरकारी कर्मचाऱ्याला धमकावून त्याला बेदम मारहाण करणं हे काँग्रेसचे माजी मंत्री आणि आमदार सुनील केदार यांच्या चांगलंच अंगलट आलं आहे. सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी नागपूर जिल्हा न्यायालयानं सुनील केदार यांना दोषी ठरवून एक वर्षाची शिक्षा सुनावली आहे. काही दिवसांपूर्वीच काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांना एका प्रकरणात कोर्टानं शिक्षा सुनावली होती. त्यानंतर आता सुनील केदार यांनाही कोर्टानं शिक्षा सुनावल्यामुळं काँग्रेसच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

नागपुरच्या केळवदमध्ये एका सरकारी अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याप्रकरणी सुनील केदार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर कोराडी ते तिडंगी या दरम्यान अतिउच्च दाबवाहिनीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी केदार यांच्याविरोधात नागपूर जिल्हा न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर आता कोर्टानं या प्रकरणात सुनील केदार यांना एक वर्षाची शिक्षा आणि दोन हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. त्यामुळं आता त्यांना लवकरच तुरुंगात दाखल केलं जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

२०१७ साली नागपूर जिल्ह्यातील तेलगाव शिवारातील शेतकऱ्यांच्या शेतात टॉवर टाकण्याचं काम सुरू होतं. त्यामुळं शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान होत असूनही महावितरणकडून त्यांना कोणताही मोबदला दिला जात नसल्यामुळं आमदार सुनील केदार यांनी घटनास्थळी दाखल होऊन सरकारी कर्मचाऱ्यांविरोधात संताप व्यक्त केला होता. त्यानंतर कर्मचाऱ्यांशी बाचाबाची झाल्यानंतर सुनील केदार यांनी समर्थकांच्या साथीनं सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण केली होती. त्यानंतर सर्व कर्मचाऱ्यांनी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी केदार यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर आता कोर्टानं आमदार सुनील केदार यांना दोषी ठरवून एक वर्षाची शिक्षा सुनावली आहे.

IPL_Entry_Point