Lok Sabha Election 2024 : राज्यात लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहे. पक्ष आणि उमेदवार निवडणुकीसाठी उमेदवारी मिळवण्यासाठी तयारीला लागले आहे. दरम्यान, भाजप आणि काँग्रेसने आपली उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यानंतर शनिवारी शरद पवार यांनी सुप्रिया सुळे यांचे बारामती लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. तर उद्धव ठाकरे यांनी सुद्धा पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघांमध्ये अमोल कीर्तिकर यांचे नाव जाहीर केले आहे. दरम्यान त्यांची ही घोषणा महावीकास आघाडीत बिघाडीचे काम करू शकतेस. कारण संजय निरुपम यांनी यावर आक्षेप घेत विरोध दर्शवला आहे.
लोकसभा निवडणुकीची आचार संहिता ही कधीही घोषित होऊ शकते. भाजप आणि इंडिया आघाडीत जोरदार चुरस आहे. सर्व पक्ष आपले उमेदवार जाहीर करत असतांना महाविकास आघाडीत काही जागांबाबत अजून तिढा सुटला नसतांना उद्धव ठाकरे यांनी पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघांमध्ये अमोल कीर्तिकर यांचे नाव जाहीर केले आहे. मात्र, त्यांच्या या उमेदवारीला काँग्रेसचे संजय निरूपम यांनी विरोध दर्शवला आहे. याबाबत त्यांनी ट्वीट करत नाराजी व्यक्त करत अमोल कीर्तिकर यांच्या उमेदवारीला विरोध केला आहे.
निरुपम यांनी केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, "अमोल कीर्तीकर यांची खिचडी घोटाळ्या प्रकरणांमध्ये ईडी कडून चौकशी सुरू आहे. अशा चौकशी सुरू असणाऱ्या उमेदवाराचा काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते प्रचार करणार का? असे निरुपम यांनी ट्विमध्ये म्हटले आहे.
संजय निरुपम हे उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार म्हणून इच्छुक आहेत. या बाबत त्यांनी या पूर्वी स्पष्ट भूमिका मांडली आहे. दरम्यान महावीकास आघाडीत या बाबत चर्चा सुरू असतांना उद्धव ठाकरेंनी अमोल कीर्तीकर यांच्या उमेदवारीची घोषणा केल्याने संजय निरुपम समर्थक नाराज झाले आहेत.
महाविकास आघाडीच्या जागा वाटप संदर्भात चर्चेची गुऱ्हाळे सुरू असतांना उद्धव ठाकरे यांनी त्यांचा उमेदवार घोषित करणे चुकीचे आहे असे निरुपम यांचे म्हणणे आहे. सध्या महाविकास आघाडीत ८ ते ९ जागांवरून तिढा सुरू आहे. हा अद्याप सुटलेला नाही. उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात संजय निरुपम यांनी त्यांच्या उमेदवारीची दावेदारी केली आहे. त्यात यावर निर्णय झाला नसतांना शिवसेना ठाकरे गटाकडून अमोल कीर्तिकर यांची उमेदवारी झाल्याने महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे.