मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Koshyari: जे झालं, त्यात कोश्यारींपेक्षा आरएसएसच्या संस्कारांचा दोष जास्त; काँग्रेसचा हल्लाबोल

Koshyari: जे झालं, त्यात कोश्यारींपेक्षा आरएसएसच्या संस्कारांचा दोष जास्त; काँग्रेसचा हल्लाबोल

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Feb 12, 2023 04:57 PM IST

Sachin Sawant on B S Koshyari : भगतसिंह कोश्यारी यांच्या गच्छतीनंतर येणाऱ्या नव्या राज्यपालांकडून फारशी अपेक्षा नसल्याचं काँग्रेसनं म्हटलं आहे.

B S Koshyari
B S Koshyari

Congress on Bhagat Singh Koshyari : सततची वादग्रस्त विधानं आणि त्यामुळं उफाळलेल्या जनतेच्या रोषानंतर अखेर केंद्र सरकारनं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर केला आहे. कोश्यारी यांच्या जागी आता नवे राज्यपाल म्हणून रमेश बैस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या निर्णयानंतरही विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. येणाऱ्या राज्यपालांकडून फारशी अपेक्षा नसल्याचं काँग्रेसनं म्हटलं आहे.

महाराष्ट्र काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी राज्यपालांच्या राजीनाम्याच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे. कोश्यारी यांच्या राज्य पालपदाच्या कार्यकाळात जे काही घडलं त्याचा दोष सावंत यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार, विचार आणि मोदी सरकारच्या दबावाला दिला आहे. 'गेल्या ९ वर्षांत देशातील अनेक राज्यांत मोदी सरकारनं नेमलेल्या राज्यपालांप्रमाणेच भगतसिंह कोश्यारी यांची कारकीर्द राज्यपाल पदाची प्रतिष्ठा प्रचंड कमी करणारी होती. तसा कोश्यारीजींचा दोष कमी होता, संघाचे संस्कार, संघाचे विचार आणि मोदी सरकारचा दबाव अधिक दोषी होता, असं त्यांनी म्हटलं आहे.

'अनेक राज्यपाल आले, पण अशा पद्धतीनं जनतेच्या तिरस्काराचं धनी कोणाला व्हावं लागलं नाही. जनतेनं नाकारूनही व कोश्यारींनी मागणी करूनही भाजप त्यांना हटवत नव्हता, हा महाराष्ट्राचा अनादर होता, याकडं सावंत यांनी लक्ष वेधलं आहे.

'एक अकेला सब पे भारी' म्हणणाऱ्या घमेंडखोर मोदी सरकारला अखेर विरोधकांसमोर झुकावे लागलं. जनमताच्या रेट्यासमोर अनेक हुकुमशाह्या कोलमडून पडल्या आहेत आणि जनतेचा रेटा वाढत चालला आहे हे लक्षात ठेवा. एकाधिकारशाही प्रस्थापित करण्यासाठी मोदी सरकार अनेक संविधानिक संस्थांचं व भाजप नेत्यांचं नैतिक अधःपतन करवत आहे. त्यामुळंच येणाऱ्या राज्यपालांकडून अधिक अपेक्षा नाही, असं सावंत यांनी म्हटलं आहे.

आता ते स्वत:ला नैतिक कामात गुंतवू शकतील!

'कोश्यारींचं पदावरून जाणं हे त्यांच्यासाठीही योग्य आहे. सातत्यानं भाजपच्या सांगण्यानुसार विरोधकांना छळणं व मर्यादा ओलांडण्याऐवजी आता ते स्वतःला नैतिक कामात गुंतवू शकतील. कोश्यारींना पुढील कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा आणि त्यांना उत्तम आयुरारोग्य लाभो, अशी सदिच्छा सावंत यांनी आपल्या ट्वीटमध्ये शेवटी व्यक्त केली आहे.

WhatsApp channel