मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  ‘काश्मीर फाइल्स’चं प्रमोशन करणारे पंतप्रधान मोदी राहुल भटच्या हत्येवर गप्प का?'
नरेंद्र मोदी
नरेंद्र मोदी (ANI)
14 May 2022, 5:44 AM ISTGanesh Pandurang Kadam
  • Share on Twitter
  • Share on FaceBook
14 May 2022, 5:44 AM IST
  • काश्मिरी पंडित राहुल भट यांच्या हत्येवरून काँग्रेसनं भारतीय जनता पक्ष व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घेरले.

'काश्मिरी पंडितांबद्दल भाजपला काहीही देणंघेणं नसून त्यांच्याबद्दलचा कळवळा हा केवळ देखावा होता. राहुल भट (Rahul Bhatt) या काश्मिरी पंडित तरुणाच्या हत्येसोबत लाखो काश्मिरी पंडितांच्या आशा, आकांक्षा आणि स्वप्नांची चिताही रचली गेली आहे. काश्मिरी पंडितांच्या आजच्या विदारक परिस्थितीला भाजपच जबाबदार आहे. मोदी सरकारनं गेली ८ वर्षे काश्मिरी पंडितांच्या दुखाग्नीवर राजकीय पोळ्या भाजल्या आणि सत्तेच्या बाजारात काश्मिरी पंडितांचे दुःख विकलं हे स्पष्ट झालं आहे, अशी घणाघाती टीका काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

काश्मिरी पंडितांच्या प्रश्नावर सचिन सावंत यांनी भाजपचा खरपूस शब्दांत समाचार घेतला. भाजपच्या पाठिंब्यावर केंद्रात आलेल्या तत्कालीन व्ही. पी. सिंह सरकारच्या काळात काश्मिरी पंडितांचं स्थलांतर झालं. त्यावेळी भाजपचेच के. जगमोहन हे राज्यपाल होते. याच काळात काश्मिरी पंडितांचे खून झाले व त्यांना आपली घरंदारं सोडून जाण्यास प्रवृत्त केलं गेलं. तरीही काश्मिरी पंडितांचं दुःख व कलम ३७० चं भांडवल सातत्यानं भाजप करत राहिली. २०१९ ला ३७० कलम हटवताना काश्मीरमधील दहशतवाद संपेल व पंडितांची घरवापसी होईल असं आश्वासन दिलं, पण मोदी सरकारच्या काळात दहशतवाद संपलेला नाही तर पूर्वीपेक्षा अधिक वाढला आहे, असा आरोप सावंत यांनी केला.

'देशभर मुस्लिम द्वेष पसरविण्यासाठी भाजपनं काश्मीरी पंडितांवरील अत्याचाराचा, अनुपम खेरसारख्या पिट्टूचा व मीडियाचा वापर केला. ‘काश्मीर फाईल्स’ (Kashmir Files) या चित्रपटाचं प्रमोशन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः केलं. जनभावना भडकावण्यासाठी चित्रपटात अर्धसत्य व अंगावर शहारे आणणाऱ्या हिंसेचा वापर केला गेला. या चित्रपटातून निर्मात्यांनी २५० कोटींपेक्षा जास्त कमावले पण काश्मिरी पंडितांचे हात मात्र रितेच राहिले. आज काश्मीरमध्ये जे सुरू आहे ती कुठल्याही चित्रपटाची कथा नसून वास्तविकता आहे हे चित्रपटाचं प्रमोशन करणाऱ्या पंतप्रधान मोदी व भाजपनं लक्षात घ्यावं, असं सावंत यांनी सुनावलं आहे.

'डॉ. मनमोहन सिंह यांच्या नेतृत्वातील यूपीए सरकारच्या दहा वर्षांत ३००० पेक्षा जास्त पंडितांना नोकऱ्या दिल्या. ५९११ घरे बांधली पण मोदी सरकारनं काहीच केलं नाही. उलट काश्मिरी मुसलमानांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं व काश्मिरी पंडितांपासून दूर करण्याचा प्रयत्न केला. यातून स्थानिक पंडितांचे जीव धोक्यात घातले गेले. आज केंद्रात भाजप सरकार आणि जम्मू काश्मीरमध्ये भाजपनं नियुक्त केलेले राज्यपाल मनोज सिन्हा आहेत. त्यामुळं राहुल भट यांच्या हत्येचा जाब आता काश्मिरी पंडित मोदी सरकारला विचारत आहेत. आठ वर्षांत काय केलं? हा प्रश्न विचारत आहेत. यावर पोलीस अश्रूधूर व लाठ्यांचा वर्षाव करत आहेत. आधीच अत्याचारग्रस्त पंडितांवर आताचे अत्याचार होतानाचे चित्र विदारक आहे, असं सावंत म्हणाले.

'काश्मिरी पंडितांचे डोळे आता उघडले आहेत आणि भाजपकडून धर्मांधतेची अफूची गोळी खाल्लेल्यांचे डोळेही उघडतील, अशी आशा सावंत यांनी व्यक्त केली.

  • Share on Twitter
  • Share on FaceBook

विभाग