Congress attacks Ashok Chavan : ‘अशोक चव्हाण यांना काँग्रेसनं काय नाही दिलं? दोन वेळा मुख्यमंत्री बनवलं, प्रदेशाध्यक्ष, आमदार, खासदार सगळी पदं दिली. तरीही ते भाजपमध्ये गेले. घोटाळ्याची चौकशी होणार समजताच मैदान सोडून पळाले. ते डरपोक आहेत,’ अशी खरमरीत टीका काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी अशोक चव्हाण यांनी केली.
चव्हाण यांच्या पक्षांतराच्या पार्श्वभूमीवर रमेश चेन्नीथला यांच्या उपस्थितीत आज गांधी भवन इथं काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ‘अशोक चव्हाण यांना काँग्रेसनं काय नाही दिलं? त्यांच्यावर पक्षानं असा कुठला अन्याय केला? त्यांच्यावर अत्याचार केला का? काँग्रेसची ध्येयधोरणं चुकीची आहेत का? त्यांच्यावर ईडीचा दबाव आहे का? याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे, असं चेन्नीथला म्हणाले.
'पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यापासून दोन वेळा अशोक चव्हाण पत्रकारांशी बोलले. मात्र आपण काँग्रेस का सोडतोय हे त्यांनी सांगितलं नाही. नांदेडमधील महापौर, नगरसेवक व इतर पदाधिकारी आज आम्हाला येऊन भेटले. त्यांनाही काही सांगण्याची तसदी अशोक चव्हाण यांनी घेतली नाही. राजकारणात असलेल्या व्यक्तीची ती जबाबदारी असते, पण त्यांनी ते केलं नाही. महाराष्ट्राची जनता हे अजिबात स्वीकारणार नाही,’ असं चेन्नीथला म्हणाले.
‘अशोक चव्हाण यांच्या जाण्यामुळं पक्षाला काही फरक पडणार नाही. इतर कोणीही पक्ष सोडणार नाही, मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष कार्यकर्त्यांसह जोमानं लढा देत राहील. चव्हाण यांच्या राजीनाम्यामुळं पक्ष आणखी मजबूत होईल,’ असा विश्वास चेन्नीथला यांनी व्यक्त केला. राज्यात निवडणूक झाल्यास महाविकास आघाडीचं सरकार पुन्हा सत्तेत येईल, असंही ते म्हणाले.
‘भाजपनं अशोक चव्हाण यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आदर्श घोटाळ्याचा आरोप केला आणि आज ते भाजपात गेले, भाजपाच्या वॉशिंग मधून धुवून ते स्वच्छ झाले. अजित पवार यांच्यावर ७० हजार कोटींच्या घोटाळाच्या आरोप पंतप्रधान मोदींनीच केला होता, त्यांनाही सत्तेत सहभागी करून घतले. मोदी-शहांना भेटले की भ्रष्टाचाराचे डाग पुसले जातात का?,' असा खोचक सवालही त्यांनी केला.
‘काँग्रेसनं अशोक चव्हाण यांना नेहमीच मोठी संधी दिली. भाजपमध्ये त्यांना ती संधी मिळणार नाही, आता त्यांना मागील रांगेत बसावे लागेल. अजूनही वेळ गेलेली नाही. त्यांनी निर्णयाचा फेरविचार करावा, असं पटोले म्हणाले. 'नांदेड हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे आणि नांदेड लोकसभेची जागाही काँग्रेस पक्षच जिंकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.