Rahul Gandhi Pratapgad Fort Visit : देशातील २६ विरोधी पक्षांनी एकत्र येत केंद्रातील मोदी सरकारविरोधात इंडिया आघाडी तयार केली आहे. पाटणा, बंगळुरुनंतर आता उद्यापासून इंडिया आघाडीची तिसरी बैठक मुंबईत होणार आहे. त्यासाठी देशातील विरोधी पक्षांच्या नेत्यांनी मुंबईत दाखल होण्यास सुरुवात केली आहे. ३१ ऑगस्ट आणि ०१ सप्टेंबर असे दोन दिवस होणाऱ्या या बैठकीसाठी उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस पक्षाकडून जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. त्यातच आता या बैठकीसाठी मुंबईला येणारे राहुल गांधी प्रतापगडावर जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. राहुल गांधी यांचं महाराष्ट्रात स्वागत करण्यासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह अनेक दिग्गज नेते मुंबई विमानतळावर जाणार असून त्यानंतर त्यांना प्रतापगडाच्या भेटीचं निमंत्रण देण्यात येणार असल्याची माहिती आहे.
कन्याकुमारी ते काश्मिर अशी भारत जोडो यात्रा केल्यानंतर राहुल गांधी सातत्याने लोकांमध्ये असल्याचं दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी दिल्ली ते लडाख अशी बाईकवारी केली होती. त्यामुळं चढाईसाठी अत्यंत खडतर असलेल्या प्रतापगडाच्या दौऱ्यासाठी काँग्रेस नेत्यांकडून राहुल गांधी यांना प्रतापगडावर येण्याचं निमंत्रण देण्यात येणार आहे. त्यामुळं आता राहुल गांधी यांनी निमंत्रण स्वीकारल्यास ते असंख्य काँग्रेस कार्यकर्त्यांसह प्रतापगडावर जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी राहुल गांधी हे दिल्लीहून विशेष विमानाने मुंबईत दाखल होणार आहे. त्यावेळी काँग्रेसचे बडे नेते त्यांची भेट घेत प्रतापगडावर जाण्यासाठीची मागणी करणार असल्याची माहिती आहे.
महाराष्ट्रातील शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून मुंबईतील बैठकीचं आयोजन करण्यात येत आहे. त्यासाठी मराठवाडा, विदर्भ, कोकण, पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्र अशा अनेक विभागातून मोठ्या संख्येने काँग्रेसचे कार्यकर्ते मुंबईत दाखल होत आहे. राजदचे अध्यक्ष लालू यादव मुंबईत दाखल झाले असून उद्या मुख्यमंत्री नितीश कुमार मुंबईत येणार असल्याची माहिती आहे. तसेच तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन, बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन हे देखील उद्या म्हणजेच गुरुवारी मुंबईत दाखल होणार असल्याची माहिती आहे.
संबंधित बातम्या