कॉंग्रेस नेते राहुल गांधी नाशिकच्या काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेणार आहेत. येत्या १२ मार्च रोजी राहुल गांधी यांचा नाशिक दौरा ठरला कॉंग्रेस पक्षाकडून त्यांच्या या यात्रेची जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे.
राहुल गांधी यांची ‘भारत जोडो न्याय यात्रा’ सध्या उत्तर प्रदेशातून जात आहे. उत्तर प्रदेशात भारत जोडो न्याय यात्रेत समाजवादी पक्षाचे नेते, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव, कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी सहभाग घेतला होता. उत्तर प्रदेशात ‘भारत जोडो न्याय यात्रे’ला लोकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे पहायला मिळत आहे.
दरम्यान, उत्तर प्रदेशनंतर ‘भारत जोडो न्याय यात्रा’ मध्य प्रदेश, राजस्थान आणि गुजरात मार्गे मार्च महिन्यात महाराष्ट्रात प्रवेश करणार आहे. पहिल्या टप्प्यात ११ मार्च रोजी नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे राहुल गांधी यांची जाहीर सभा होणार आहे. त्यानंतर १२ मार्च रोजी राहुल गांधी नाशिकच्या काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेणार आहे.
अयोध्येतील २२ जानेवारी रोजी झालेल्या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ दिवसांचे अनुष्ठान केले होते. या अनुष्ठानची सुरूवात मोदी यांनी नाशिकच्या काळाराम मंदिरात जाऊन पूजाविधीने केली होती. १२ जानेवारी रोजी नाशिकच्यागोदावरी नदीच्या काठावर असलेल्या रामकुंडावर जाऊन पंतप्रधान मोदी यांनी पूजा केली होती. पूजेनंतर त्यांनी मंदिराच्या आवारात बसून कीर्तनात सहभाग घेतला होता. धार्मिक पौराणिक कथांनुसार भगवान राम, लक्ष्मण आणि सीता यांनी त्यांच्या १४ वर्षांच्या वनवासात बहुतांश वेळ हा नाशिकच्या काळाराम मंदिर परिसरात घालवला होता.
२२ जानेवारी रोजी अयोध्येत प्राणप्रतिष्ठा सोहळा सुरू असताना शिवसेना पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाशिकच्या काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेतले होते. ठाकरे यांनी पत्नी रश्मी ठाकरे, मुलगा, माजी मंत्री आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे यांच्यासोबत नाशिकमध्ये रामकुंडवर जाऊन महाआरती केली होती.
संबंधित बातम्या