काँग्रेस नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा आज (शुक्रवार) कोल्हापूरचा नियोजित दौरा ऐनवेळी रद्द झाला आहे. राहुल गांधी आजपासून दोन दिवस कोल्हापूर दौऱ्यावर येणार होते. त्यांच्या हस्ते कोल्हापुरातील कसबा बावडा येथील छत्रपती शिवाजी महाराज पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण आणि संविधान सन्मान संमेलनासाठी राहुल गांधी आज कोल्हापुरात येणार होते. मात्र राहुल गांधी यांच्या विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने आजचा कोल्हापूर दौरा रद्द करण्यात आला आहे.
राहुल गांधी उद्या (शनिवार ५ ॲाक्टोबर) रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येत असून सकाळी ९.३० वा. कसबा बावडा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करणार आहेत. त्यानंतर कोल्हापूर येथे संविधान सन्मान संमेलनाला उपस्थित राहणार आहेत.
राहुल गांधी आज कोल्हापूर दौऱ्यावर येणार होते. त्यांचा हॉटेल सयाजी येथे मुक्काम होता. मात्र विमानातील तांत्रिक बिघाडामुळे ते आज कोल्हापुरात पोहचू शकले नाहीत. आता ते शनिवारी (५ ऑक्टोबर) सकाळी नऊ वाजता कोल्हापुरात येणार आहेत. दरम्यान गांधी यांच्या हस्ते शुक्रवारी सायंकाळी कसबा बावडा येथील भगवा चौक येथे होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळाचे अनावरण एक दिवस पुढं ढकललं आहे. आता राहुल गांधी गांधी यांच्या हस्ते शनिवारी सकाळी साडे नऊ वाजता शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अनावरण होणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे नेते व विधान परिषदेमधील गटनेते व आमदार सतेज पाटील यांनी दिली आहे.
कसबा बावडा येथील भगवा चौक येथे होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळाचे अनावरण कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू होती. पूर्व नियोजित कार्यक्रमानुसार राहुल गांधी आज शुक्रवारी ५.४० वाजता कोल्हापुरात येणार होते. त्यानंतर सायंकाळी त्यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण होते. परंतु अचानक दौऱ्यात बदल झाल्याची बातमी धडकली. आता उद्या सकाळी साडे नऊ ते १० वाजता राहुल गांधी यांच्याच हस्ते पुतळा अनावरण सोहळा होईल. त्यानंतर ते शाहू समाधीस्थळी राजर्षि शाहू महाराज यांना अभिवादन करतील. त्यानंतर संविधान सन्मान परिषदेस उपस्थित राहून सायंकाळी खास विमानाने दिल्लीस रवाना होतील. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांच्या महाराष्ट्र दौऱ्याबाबत उत्सुकता आहे.
दरम्यान, राहुल गांधी यांनी अमेरिकेत आरक्षणाबद्दल केलेल्या वक्तव्याबाबत भाजप कार्यकर्ते राहुल गांधी यांना कोल्हापुरात काळे झेंडे दाखवणार आहेत, अशी माहिती भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.
संबंधित बातम्या