Ashok Chavan Resigns: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे मोठे नेते अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्याने महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप झाला. अशोक चव्हाण हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपली प्रतिक्रिया दिली.
अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर नाना पटोले यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, "काँग्रेस पक्षाने अनेक नेत्यांना खूप काही काही दिले आहे. आज काँग्रेस पक्ष संविधान आणि लोकशाही वाचविण्याची लढाई लढत असताना सर्वकाही मिळालेले नेते काँग्रेस पक्षाला आणि विचारधारेला सोडून जात आहेत हे दुर्देवी आहे. कोण, कशासाठी, कुठे जात आहे? हे जनता उघड्या डोळ्याने पहात आहे. आम्ही सर्व काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते काँग्रेसचा विचार आणि लोकशाही वाचविण्यासाठी धर्मांध, हुकुमशाही वृत्तीच्या भारतीय जनता पक्षाविरोधात पूर्ण ताकदीनिशी लढून त्यांना पराभूत करू."
अमित शाह हे येत्या १५ फेब्रुवारीपासून महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्यावेळी अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वासह भोकर विधानसभेच्या आमदारचाही राजीनामा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सोपावला. भाजपमध्ये अशोक चव्हाण यांना मोठे पद मिळण्याची शक्यता आहे. त्यांना राज्यसभेवर घेतले जाणार, अशी चर्चा आहे.
“अशोक चव्हाण यांचा राजीनामा धक्कादायक आहे. अचानक का निर्णय घेतला माहीती नाही. माझ्याशी चर्चा झाली नाही. मी २००७ पासून त्यांच्याबरोबर काम केले आहे. यामुळे अशोक चव्हाण यांच्यापाठोपाठ विजय वडेट्टीवार देखील काँग्रेस रामराम ठोकणार अशी चर्चा आहे. मात्र, यात तथ्य नाही. मी मतदारसंघात फिरत आहे. ज्या पद्धतीने पक्ष भाजप फोडत आहेत, मतदार राजा या फुटीला वैतागला आहे. मतदार त्यांना धडा शिकवतील”, असे विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत.
संबंधित बातम्या