मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  अंधेरी ByPoll बिनविरोधचं MCA कनेक्शन? नाना पटोलेंननी व्यक्त केला संशय
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (HT PHOTO)

अंधेरी ByPoll बिनविरोधचं MCA कनेक्शन? नाना पटोलेंननी व्यक्त केला संशय

17 October 2022, 12:52 ISTSuraj Sadashiv Yadav

Nana Patole On Andheri Bypoll: नाना पटोले म्हणाले की," एमसीएच्या निवडणुकीनंतरच असा चमत्कार घडतो का? एक व्यक्ती भाजपचा मुंबई शहरातल्या एका नेत्याच्या घरी जातो त्यानंतर असं काही होतं."

Nana Patole On Andheri Bypoll: अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची रंगत आता वाढली आहे. आज अर्ज माघारीचा शेवटचा दिवस आहे. भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांनी माघार घ्यावी यासाठी दबाव टाकण्यात येत असल्याचं म्हटलं जातंय. दरम्यान, या सगळ्या घडामोडीत आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वेगळाच संशय व्यक्त केला आहे. एमसीएच्या निवडणुकीसाठी अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं अप्रत्यक्षपणे नाना पटोले यांनी म्हटलं. तसंच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांच्याकडे बोट दाखवलं.

ट्रेंडिंग न्यूज

अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीवर भाष्य करताना नाना पटोले यांनी बिनविरोधच्या चर्चेवर शंका व्यक्त केली. एमसीएची निवडणूक सध्या सुरू आहे. पैशाच्या खजिन्याची निवडणूक सुरू आहे. एमसीए म्हणजे पैशाचा खजिना, याच पार्श्वभूमीवर देशातील आणि राज्यातील लोक चित्र पाहत आहेत. त्यातच दोन नेत्यांनी एकदम बिनविरोध निवडणूक व्हावी अशी भूमिका घेतली. त्यामुळे एमसीएच्या राजकारणाचा कुठेतरी वास येत असल्याचा संशय नाना पटोले यांनी व्यक्त केला.

नाना पटोले यांनी म्हटलं की,"मला थेट आरोप नाही लावायचा, मात्र एमसीएमध्ये जे सुरू आहे त्यावर मी बोलत आहे. राज्यात आतापर्यंत तीन पोटनिवडणुका झाल्या, पण एकही बिनविरोध झाली नाही. एमसीएच्या निवडणुकीनंतरच असा चमत्कार घडतो का? एक व्यक्ती भाजपचा मुंबई शहरातल्या एका नेत्याच्या घरी जातो त्यानंतर असं काही होतं, यात नक्कीच एमसीए निवडणुकीचा वास आहे." अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध कऱण्याची चर्चा सुरू आहे. त्यावर बोलताना नाना पटोलेंनी म्हटलं की, "एमसीए निवडणुकीत काय झालं हे पाहिलं. कोण-कोण एकत्र आलं? निवडणूक बिनविरोध झाल्यास आमचा काही विरोध नाही. जनता समजदार आहे."

नाना पटोले यांनी म्हटलं की, "काँग्रेस लोकशाहीच्या मार्गाने चालणारा पक्ष आहे. घराणेशाहीचे आरोप जे करतात तेच घराणेशाहीत अडकले आहेत. फक्त घराणेशाहीचे आरोप लावून चालणार नाही तर कृतीत नसणं हे चुकीचं आहे. लोकशाही पद्धत ज्यांना मान्य आहे त्यांनी काँग्रेसची लोकशाही अवलंबायला हवी." काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी आज मतदान होत आहे. त्यावर बोलताना पटोले म्हणाले की, दोन्हीही काँग्रेसचे मातब्बल नेते उमेदवार आहेत. दोघांचाही संसदीय प्रणालीचा अभ्यास पूर्ण आहे. काँग्रेस हा गांधी कुटुंबापुरताच नाही तर देशाचा पक्ष आहे. मिस कॉलवाली पार्टी नाहीय. गांधी कुटुंबाला देशापेक्षा मोठं कुणीही नाही.