मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Nana Patole LIVE : ठाकरेंच्या सावरकरांवरील भूमिकेमुळं महाविकास आघाडीत ठिणगी?, नाना पटोले म्हणाले...

Nana Patole LIVE : ठाकरेंच्या सावरकरांवरील भूमिकेमुळं महाविकास आघाडीत ठिणगी?, नाना पटोले म्हणाले...

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Mar 27, 2023 05:43 PM IST

Nana Patole LIVE : सावरकरांच्या मुद्द्यावर काँग्रेस आणि शिवसेनेचे विचार फार वेगवेगळे असल्याचं वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं आहे.

Nana Patole On Uddhav Thackeray
Nana Patole On Uddhav Thackeray (PTI)

Nana Patole On Uddhav Thackeray : नाशिकच्या मालेगावमधील सभेत सावरकरांच्या अपमानाचा मुद्दा उपस्थित करत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना चांगलंच खडसावलं होतं. सावरकर हे आमचे दैवत असून त्यांचा अपमान झाला तर सहन केला जाणार नाही, असं म्हणत ठाकरेंनी सावरकरांबाबतची भूमिका स्पष्ट केली होती. त्यामुळं आता ठाकरेंच्या भूमिकेमुळं महाविकास आघाडीतील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. त्यातच आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उद्धव ठाकरेंच्या भूमिकेवर सावध प्रतिक्रिया दिली आहे. सावरकरांच्या मुद्द्यावर शिवसेना आणि काँग्रेसचे विचार वेगवेगळे आहेत. परंतु लोकशाही आणि संविधान वाचवण्याच्या लढाईत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकजूटीनं लढणार असल्याचं नाना पटोलेंनी म्हटलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

काँग्रेस हा सर्व जाती-धर्मांना सोबत घेऊन पुढे जाणारा पक्ष आहे. आमचा पक्ष कोणत्याही धर्माचा अथवा व्यक्तीचा द्वेष करत नाही. त्यामुळं सावरकरांच्या मुदद्यांवर राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे एकमेकांशी चर्चा करतील, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. देशात निर्माण झालेल्या राजकीय स्थितीमुळं राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस किमान समान कार्यक्रमाच्या माध्यमातून एकत्र आलेले आहे, त्यामुळं भाजपविरोधात आम्ही सर्वजण एकत्र लढा देणार असल्याचंही नाना पटोले म्हणाले. सावरकरांबद्दल काँग्रेसची भूमिका आधीपासूनच स्पष्ट आहे. त्यात नवं काहीही नाही. सावरकरांच्या मुद्द्यावरून सत्ताधारी महाविकास आघाडीत फूट पाडण्याचं प्रयत्न करत आहेत. परंतु त्यांना त्यात यश येणार नाही. सावरकरांच्या मुद्दा पुढे करून सत्ताधाऱ्यांना त्यांच्या जबाबदाऱ्यांपासून पळ काढता येणार नाही, असंही पटोले यांनी म्हटलं आहे.

सावरकरांनी ब्रिटिशांची माफी मागितल्यानंतर त्यांची सुटका झाली. त्यानंतर त्यांनी द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत मांडला. परिणामी देशभरात हिंदू-मुस्लिम असा वाद निर्माण झाला. त्यामुळं देशाच्या फाळणीत सावरकरांचं मोठं योगदान होतं, असंही नाना पटोले यांनी म्हटलं. सावरकरांनी देशभरात विषाक्त वातावरण निर्माण केलं त्यातूनच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या करण्यात आली, याची पुष्टी खुद्द सरदार वल्लभभाई पटेल यांनी केली होती, असं पटोले यांनी म्हटलं आहे.

IPL_Entry_Point