मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Kolhapur Violence : राज्यात रोज दंगली सुरू असताना गृहमंत्री काय करतायंत?, नाना पटोलेंचा फडणवीसांवर हल्लाबोल

Kolhapur Violence : राज्यात रोज दंगली सुरू असताना गृहमंत्री काय करतायंत?, नाना पटोलेंचा फडणवीसांवर हल्लाबोल

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Jun 07, 2023 03:50 PM IST

Nana Patole On Kolhapur Violence : फडणवीसांचं गृहखात्यावर नियंत्रण राहिलेलं नाही, त्यामुळं मुख्यमंत्री शिंदेंनी त्यांचा राजीनामा घेऊन सक्षम गृहमंत्री नेमावा, अशी मागणी नाना पटोलेंनी केली आहे.

nana patole vs devendra fadnavis
nana patole vs devendra fadnavis (HT)

Nana Patole On Kolhapur Violence : दोन गटात झालेल्या राड्यानंतर कोल्हापुरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच कोल्हापूर शहर परिसरातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली असून शहरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. परंतु आता राज्यातील हिंसाचाराच्या घटनांवरून विरोधकांनी सत्ताधारी शिंदे गट व भाजपावर जोरदार टीका केली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी शिंदे-फडणवीसांवर दंगलीवरून गंभीर आरोप करत सरकारच्या राजीनाम्याम्याची मागणी केली आहे. त्यामुळं आता यावरून मोठं राजकीय वादंग माजण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात कटकारस्थान करुन सत्तेत आलेले शिंदे फडणवीस सरकार कायदा सुव्यवस्था राखण्यात सपशेल अपयशी ठरले आहे. गुन्हेगारांचे मनोबल वाढले असून पोलीस कारवाई करण्यात अपयशी ठरत आहेत. फडणवीस गृहमंत्री असतानाच धर्मांध शक्तींना प्रोत्साहन कसे मिळत आहे?, राज्यात दंगली घडवण्याचा पहिला प्रयत्न मागील महिन्यात फसल्यानंतर आता पुन्हा औरंगजेबाचा मुद्दा पुढे करून वातावरण अशांत करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

राज्यात पोलिसांचं नाही तर समाजकंटकाचं आणि गुन्हेगाराचे राज्य आहे, अशी स्थिती निर्माण झाली आहे. देवेंद्र फडणवीस यांचे गृहखात्यावर आणि पोलिसांवर नियंत्रण राहिलेलं नाही. त्यामुळं मुख्यमंत्री शिंदेंनी त्यांचा राजीनामा घेऊन सक्षम गृहमंत्री नेमावा, अशी मागणीही नाना पटोले यांनी केली. शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात औरंगजेबाचं उदात्तीकरण सुरू आहे. औरंगजेबाचे उदात्तीकरण करणारे आत्ताच बिळातून बाहेर कसे आले?, राज्यात रोज दंगली सुरू आहे. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री काय करत आहेत?, शिंदे-फडणवीस सरकार नपुंसक आहे असे सुप्रीम कोर्टाने म्हटले होते ते खरंच होतं, असं म्हणत नाना पटोले यांनी शिंदे सरकारवर घणाघात केला आहे.

संभाजीनगर, अहमदनगर, शेवगाव, अमरावती, नाशिकमध्ये धार्मिक मुद्द्यांना हवा देऊन राज्यात दंगली घडवण्याचा प्रयत्न मागील महिन्यात झाला पण लोकांनी सामंजस्याची भूमिका घेतल्याने तो प्रयत्न फसला. आता पुन्हा धर्मांध शक्ती अहमदनगर व कोल्हापूर जिल्ह्यात औरंगजेबाचा मुद्दा पुढे करुन वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहे. पोलीस खात्याचा वचक असेल तर गुन्हेगारांची अशी हिम्मत होणार नाही. राज्यात धार्मिक मुद्द्यांना हवा देऊन दंगली भडकावून आपली राजकीय पोळी भाजपाचा कुटील डाव आहे. त्यामुळे फडणवीस जाणीवपूर्व अशा घटनांकडे दुर्लक्ष करत आहेत का?, राज्यात कायदा सुव्यवस्था राखणे हे गृहविभागाचे काम आहे, परंतु गृहमंत्री आणि पोलीस यंत्रणा काय करते आहे?, असा सवालही नाना पटोले यांनी केला आहे.

मुंबईत महिला सुरक्षित नाही- पटोले

मुंबईतील चर्चगेट येथील हॉस्टेलमध्ये एका महाविद्यालयीन तरुणीची हत्या केल्याचे उघड झाले आहे. तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याचे दिसत आहे. मंत्रालय आणि मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असणा-या मलबार हिल पासून हाकेच्या अंतरावर असणा-या वसतीगृहात दिवसाढवळ्या एका विद्यार्थीनीवर अत्याचार करून तीची हत्या केली जाते ही महाराष्ट्राला लाज आणणारी बाब आहे. सत्तेवर बसलेल्या लोकांना या प्रकरणाचं काहीच वाटत नाही, ही अत्यंत दुर्देवाची गोष्ट आहे. मुंबई सारख्या शहरातच मुली सुरक्षित नाहीत. राज्यातून हजारो महिला आणि मुली बेपत्ता होत आहेत आणि सरकार मात्र झोपलेले आहे, असं म्हणत नाना पटोले यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला आहे.

IPL_Entry_Point