‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेकेखोर पद्धतीने राज्याचा कारभार हाकत आहेत’ : कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेकेखोर पद्धतीने राज्याचा कारभार हाकत आहेत’ : कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ

‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेकेखोर पद्धतीने राज्याचा कारभार हाकत आहेत’ : कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ

HT Marathi Desk HT Marathi
Updated Mar 15, 2025 08:54 PM IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे हेकेखोर पद्धतीने राज्यकारभार हाकत असून त्यांच्या मंत्रिमंडळात एक-एक मंत्री एक-एक नमुना आहे, अशी टिका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी कोकणातील सिंधुदुर्ग येथे केली.

‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेकेखोर पद्धतीने राज्याचा कारभार हाकत आहेत’ : हर्षवर्धन सपकाळ
‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेकेखोर पद्धतीने राज्याचा कारभार हाकत आहेत’ : हर्षवर्धन सपकाळ

'महाराष्ट्रात सत्ताधारी पक्षातील लोक दहशत निर्माण करत आहेत. परिणामी राज्यात कायद्याचे राज्य राहिलेले नाही. संसदीय लोकशाहीची उघडपणे पायमल्ली केली जात आहे. विविध जाती-धर्मातील एकोप्याची भावना नष्ट केली जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे हेकेखोर पद्धतीने राज्यकारभार हाकत असून त्यांच्या मंत्रिमंडळात एक-एक मंत्री एक-एक नमुना आहे, अशी टिका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी कोकणातील सिंधुदुर्ग येथे केली. येथे आयोजित करण्यात आलेल्या कॉंग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. 

हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, कोकणाला निसर्ग सौंदर्य व संस्कृतीचा वारसा लाभलेला आहे, कोकणच्या या भूमीत ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त वि. स. खांडेकरांचा जन्म झाला, प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असते तुमचे आमचे सेम असते असा प्रेमाचा संदेश देणारे मंगेश पाडगावकर, मधू दंडवते, नाथ पै यांच्यासारख्या महान नेत्यांचा हा जिल्हा आहे. सभ्यता, संस्कृती व लोकशाही मुल्ये कशी असतात याचा आदर्श घालून देणारे एकापेक्षा एक सरस खासदार सिंधुदुर्ग जिल्ह्यातून संसदेवर निवडून गेलेले आहे. आज त्याच जिल्ह्यातील काही लोकांच्या तोंडातून दररोज गटारगंगा वाहत आहे. एक मंत्री हम करे सो कायदा म्हणतो, दुसरा आमदार सैराट आहे. आमच्या पक्षात नाही तर निधीच देणार नाही अशी धमकी दिली जाते, हा सर्व प्रकार महाराष्ट्र धर्म नासवण्याचा प्रकार असल्याची टिका सपकाळ यांनी केली.

नारायण राणे हे दुसऱ्या पक्षातून काँग्रेसमध्ये आले होते. ते १२ वर्ष काँग्रेसमध्ये राहिले. त्यातील ९ वर्षे ते सत्तेत राहिले. त्यांचा परभाव झाल्यानंतर विधान परिषदेवर त्यांना निवडून दिले. पण नंतर ते कडगोळे घेऊन दुसऱ्य़ा पक्षात गेले. काँग्रेसमध्ये कार्यकर्ते व सत्ता होती म्हणून ते आले होते व सत्ता नाही हे दिसताच ते परत गेले. ते जरी गेले असले तरी या जिल्ह्यात काँग्रेसचा कार्यकर्ता व काँग्रेसला मानणारा मोठा वर्ग आहे, असे सपकाळ म्हणाले.

सिंधुदुर्गातील कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी ‘पुष्पा’तील ‘झुकेगा नही साला..’ भावनेने काम करावे

काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, या जिल्ह्याच्या पालकमंत्र्याला कोकणात सामाजिक तेढ निर्माण करायचे आहे, संस्कृती मोडून काढायची आहे. आगामी काळात हा जिल्हा काँग्रेसमय करा, काँग्रेसच्या कार्यकर्त्यामध्ये आत्मविश्वास असला पाहिजे. रस्त्यावर उतरा, आंदोलन करा, जनतेचे प्रश्न हाती घेऊन काम करा. ‘पुष्पा’ चित्रपटातील ‘झुकेगा नही साला…’ या भावनेने काम करावे, असं सपकाळ म्हणाले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा विजय झाला पाहिजे, प्रत्येक तालुका, वार्ड, ग्रामपंचायतीत काँग्रेसचा कार्यकर्ता दिसला पाहिजे, असे आवाहन सपकाळ यांनी केले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर २०० वर्षानंतर महात्मा फुलेंनी त्यांची समाधी शोधून काढली या दोनशे वर्षामध्ये भाजपाच्या त्याकाळातील पिल्लावळींना महाराजांचा इतिहास पुढे आणू द्यायचा नव्हता, आताही शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा एकही पुरावा ठेवायचा नाही यातून काही विध्वंसह घटना या लोकांना करायच्या आहेत. या विखारी विचारसरणीला थांबवावे लागणार आहे. असेही सपकाळ म्हणाले.

Whats_app_banner

संबंधित बातम्या