मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Ashok Chavan: शिंदे सरकार मेहेरबान; काय करणार अशोक चव्हाण? पुन्हा चर्चेला उधाण

Ashok Chavan: शिंदे सरकार मेहेरबान; काय करणार अशोक चव्हाण? पुन्हा चर्चेला उधाण

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Oct 04, 2022 02:06 PM IST

Ashok Chavan: माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे काँग्रेसला रामराम ठोकण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे. शिंदे सरकारच्या एका निर्णयामुळं या चर्चेला बळकटी मिळाली आहे.

Ashok Chavan
Ashok Chavan

Ashok Chavan: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा थांबत नाही तोच, आता एकनाथ शिंदे सरकारनं घेतलेल्या निर्णयामुळं सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या अनेक योजना बंद करण्याचा धडका लावणाऱ्या शिंदे सरकारनं अशोक चव्हाण यांच्या मतदारसंघातील कामांना मात्र मंजुरी दिली आहे. त्यामुळं चव्हाण यांच्या राजकीय वाटचालीबाबत पुन्हा तर्कवितर्क लढवले जात आहेत.

अशोक चव्हाण हे गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसमध्ये नाराज असल्याची चर्चा आहे. राज्यात भाजप व शिंदे गटाच्या युतीचं सरकार आल्यानंतर घेण्यात आलेल्या बहुमत चाचणीच्या वेळी अशोक चव्हाण व त्यांचे समर्थक आमदार सभागृहात पोहोचलेच नव्हते. शिंदे सरकारला मदत करण्यासाठीच ते मतदानापासून दूर राहिल्याची चर्चा त्यावेळी होती. चव्हाण यांनी त्यावेळी वेगवेगळी कारणं देत ही चर्चा फेटाळून लावली होती. मात्र, त्यानंतरही त्यांच्याबद्दल चर्चा सुरूच होत्या. आता शिंदे सरकारनं अशोक चव्हाण यांच्या मतदारसंघातील महत्त्वाच्या योजनेला मंजुरी दिली आहे. 

चव्हाण यांच्या भोकर विधानसभा मतदारसंघातील वॉटरग्रीड योजनेला सरकारनं मंजुरी दिली आहे. या योजनेमुळं मतदारसंघातील तब्बल १८३ गावांना पाणी मिळू शकणार आहे. ७२८ कोटी रुपयांच्या या योजनेसाठी दहा दिवसांपूर्वी निविदा काढण्यात आल्या आहेत. अशोक चव्हाण यांना हे गिफ्ट मिळाल्यामुळं राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

भाजप की शिंदे गट? 

राज्यातील सत्ता मिळवल्यानंतर भाजपनं लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं तयारी केली आहे. प्रतिस्पर्ध्यांचे महत्त्वाचे मोहरे फोडण्यावर भाजपचा भर आहे. अशोक चव्हाण यांची नांदेड जिल्ह्यात मोठी राजकीय ताकद आहे. २०१४ च्या मोदी लाटेत भलेभले खासदार पराभूत झाले असताना अशोक चव्हाण यांनी मात्र नांदेडमधून विजय मिळवला होता. नांदेडमधील अनेक विधानसभा मतदारसंघावर त्यांचा प्रभाव आहे. त्यामुळंच त्यांना गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं बोललं जातं.

भारत जोडो यात्रेच्या मुहूर्तावर पक्षांतर?

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली देशात सध्या काँग्रेसची भारत जोडो यात्रा सुरू आहे. लवकरच ही यात्रा महाराष्ट्रात येणार आहे. तोच मुहूर्त साधून अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करतील, असंही बोललं जात आहे.

WhatsApp channel