मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Devendra Fadnavis : संघावर बंदी घालण्याच्या मागणीवरून फडणवीसांनी कॉंग्रेसला सुनावलं, म्हणाले...

Devendra Fadnavis : संघावर बंदी घालण्याच्या मागणीवरून फडणवीसांनी कॉंग्रेसला सुनावलं, म्हणाले...

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Sep 28, 2022 02:53 PM IST

Devendra Fadnavis : राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालण्याची मागणी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली होती. त्याला आता देवेंद्र फडणवीसांनी अत्यंत आक्रमक शब्दांत प्रत्युत्तर दिलं आहे.

Devendra Fadnavis vs Nana Patole
Devendra Fadnavis vs Nana Patole (HT)

Devendra Fadnavis vs Nana Patole : देशातील विविध शहरांमध्ये पॉप्यूलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यालयांवर कारवाई करण्यात आल्यानं राजकीय वादंग पेटलं आहे. कारण आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली होती. त्यानंतर आता त्यावर बोलताना राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत कडक आणि आक्रमक शब्दांत उत्तर दिलं आहे.

माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, काही लोक संघावर बंदी घालण्याची मागणी करत आहेत, परंतु आतापर्यंत संघानं असा एक तरी प्रकार केलाय का जो पीएफआयनं केलाय?, भारतात कायदा आहे, संविधान आहे. कोणताही आरोप सिद्ध करण्यासाठी पुरावे लागतात. संघावर बंदी आणण्याची मागणी करणाऱ्या लोकांकडे अक्कल कमी असल्यानं मी त्याच्यावर फार काही बोलणार नाही. असे मुर्खांसारखे बोलणारे लोक खुप आहेत,असं म्हणत फडणवीसांनी नाना पटोलेंना टोला लगावला आहे.

पॉप्यूलर फ्रंट ऑफ इंडिया ही संघटना देशात हिंसाचार घडवण्याच्या तयारीत होती. त्याबद्दलची माहिती केंद्रीय तपास यंत्रणांना मिळाली होती. हे लोक दहशतवादी कृत्य करून वातावरण खराब करण्याचं काम करत आहेत. आधी या संघटनेवर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी केरळमधून झाली. त्यानंतर आता त्यावर देशभरात बंदी घालण्यात आल्याचं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं.

दरम्यान महाराष्ट्राही पीएफआयच्या कार्यालयांवर केंद्रीय तपास यंत्रणांनी छापेमारी केली होती. त्यात मुंबई, नवी मुंबई, औरंगाबाद, मालेगांव, पुणे आणि नागपूरात संघटनेच्या कार्यालयांवर धाड टाकण्यात आली होती. देशभरात केलेल्या कारवाईत आतापर्यंत ३०० लोकांना अटक करण्यात आल्याची माहिती समोर आलेली आहे. त्यामुळं आता या प्रकरणावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे.

IPL_Entry_Point