छत्रपती शिवाजी महाराजांच्या अवमानाबद्दल भाजपाने माफी मागावी: कॉंग्रेस
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  छत्रपती शिवाजी महाराजांच्या अवमानाबद्दल भाजपाने माफी मागावी: कॉंग्रेस

छत्रपती शिवाजी महाराजांच्या अवमानाबद्दल भाजपाने माफी मागावी: कॉंग्रेस

Updated Feb 19, 2025 05:50 PM IST

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त केलेल्या ट्विटवरून भाजपने टीका केली आहे. दरम्यान, भाजपनेच माफी मागावी असं कॉंग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी म्हटलं आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या अवमानाबद्दल भाजपाने माफी मागावी: कॉंग्रेसची मागणी
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अवमानाबद्दल भाजपाने माफी मागावी: कॉंग्रेसची मागणी

शिवजयंतीच्या निमित्ताने लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलेल्या ट्विटवरून भाजपचे नेते जो आकांडतांडव करत आहेत त्याआधी त्यांनी त्यांचे सर्वोच्च नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्वीट नीट पहावे आणि नंतर बोलावे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान जर कोणी केला असेल तर भाजपनेच वारंवार केला असून त्यांनीच माफी मागावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे.

यासंदर्भात प्रतिक्रीया देताना अतुल लोंढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवजयंती निमित्त ट्विट करून श्रद्धांजली अर्पण केली आहे, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त केलेल्या ट्विटमध्येही नरेंद्र मोदी यांनी श्रद्धांजली असेच लिहिलेले आहे. त्यामुळे राहुल गांधी यांच्या ट्विटवरून भाजपा नेत्यांनी राजकारण करू नये. मालवण मधील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांनी केले होते. भाजपाच्या सरकारनेच हा पुतळा उभारला आणि अवघ्या आठ महिन्यात तो कोसळला आणि महाराजांचा अवमान केला, कोट्यवधी शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या पण अजून पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागितली नाही. अरबी समुद्रात छत्रपतींचे भव्य स्मारक उभारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते जलपूजनही करण्यात आले. पण अद्याप या स्मारकाची एक वीटही रचलेली नाही, त्याबद्दल भाजप माफी कधी मागणार, असा प्रश्न अतुल लोंढे यांनी विचारला आहे.

भाजपाच्या अनेक नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा वारंवार अवमान केला. तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीही महाराजांचा अपमान केला पण त्याबद्दल भाजपाच्या नेत्यांना जराही शरम वाटत नाही, माफी मागत नाहीत आणि राजकीय स्वार्थासाठी महाराजांचा वापर करतात अशा प्रवृत्तीचा आम्ही निषेध करतो असेही अतुल लोंढे म्हणाले.

राहुल गांधींच्या ट्विटवर भाजप आमदार अतुल भातखळकर यांची प्रतिक्रिया

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज, शिवजयंतीनिमित्त एक ट्विट केले आहे. हिंदी भाषेत असलेल्या या ट्विटमध्ये त्यांनी ‘छत्रपति शिवाजी महाराज जी की जयंती पर उन्हें सादर नमन और अपनी विनम्र श्रद्धांजलि अर्पित करता हूं। अपने साहस और शौर्य से उन्होंने हमें निडरता और पूरे समर्पण के साथ आवाज़ उठाने की प्रेरणा दी। उनका जीवन हम सभी के लिए सदैव प्रेरणास्रोत रहेगा।’ असं लिहिलं आहे. दरम्यान, जयंतीच्या दिवशी आदरांजली व्यक्त करत असल्याचं सांगत भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी राहुल गांधी यांच्या ट्विटवर टीका केली आहे. राहुल गांधी नेहमीच या देशातल्या महापुरुषांविषयी कळत-नकळत अनादर व्यक्त करत असतात. त्यातलाच हा गंभीर प्रकार आहे. हे ट्विट त्यांनी तत्काळ मागे घ्यावे आणि आदरांजली शब्दाचा वापर करावा अन्यथा त्यांना कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, असं भातखळकर यांनी म्हटलं आहे.

Haaris Rahim Shaikh

TwittereMail

हारीस शेख हे हिंदुस्तान टाइम्स -मराठीचे संपादक आहेत. यापूर्वी त्यांनी महाराष्ट्र टाइम्स (ऑनलाइन)चे संपादक म्हणून काम केले आहे. तत्पूर्वी मटा (ऑनलाइन)चे दिल्ली प्रतिनिधी, ईटीव्ही -मुंबई ब्युरोमध्ये प्रतिनिधी म्हणून काम केले. टिव्ही, प्रिंट आणि डिजिटल न्यूज माध्यम क्षेत्रात २३ वर्ष काम करण्याचा अनुभव. राजकारण, अर्थजगत, आंतरराष्ट्रीय घडामोडी या विषयांवर नियमित लिखाण.

Whats_app_banner

संबंधित बातम्या