कोल्हापूर उत्तर मतदारसंघात मोठा ट्विस्ट; काँग्रेस उमेदवार मधुरिमाराजे यांची निवडणुकीतून अचानक माघार
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  कोल्हापूर उत्तर मतदारसंघात मोठा ट्विस्ट; काँग्रेस उमेदवार मधुरिमाराजे यांची निवडणुकीतून अचानक माघार

कोल्हापूर उत्तर मतदारसंघात मोठा ट्विस्ट; काँग्रेस उमेदवार मधुरिमाराजे यांची निवडणुकीतून अचानक माघार

Nov 04, 2024 03:55 PM IST

Kolhapur North Constituency : कोल्हापूर उत्तरमतदारसंघात मोठा ट्विस्ट आला आहे.याठिकाणी काँग्रेसनंउमेदवारी दिलेल्या मधुरिमाराजे यांनीअखेरच्या क्षणी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.

मधुरिमाराजे यांची निवडणुकीतून माघार
मधुरिमाराजे यांची निवडणुकीतून माघार

उमेदवारी देण्यापासून चर्चेत आलेल्या कोल्हापूर उत्तर मतदारसंघात मोठा ट्विस्ट आला आहे.  याठिकाणी काँग्रेसनं उमेदवारी दिलेल्या मधुरिमाराजे यांनी अखेरच्या क्षणी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. यामुळे मतदारसंघातील समीकरण बदलले आहे. अपक्ष उमेदवार राजेश लाटकर यांनी कोल्हापूर उत्तरमधून भरलेला अर्ज मागे घेण्यास तयार नाहीत, त्यामुळे अधिकृत उमेदवार असलेल्या मधुरिमाराजे यांनाच अर्ज मागे घ्यावा लागला आहे. कोल्हापूरात या घडामोडीमुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. अधिकृत उमेदवाराने अर्ज मागे घेतल्याने मविआला याठिकाणी अपक्षाला पाठिंबा द्यावा लागणार आहे.

अपक्ष उमेदवार राजेश लाटकर यांनी माघार घेण्यास नकार दिल्यानं मधुरिमाराजे छत्रपती यांनी महत्वाचा निर्णय घेत आपला अर्ज मागे घेतला आहे. मधुरिमाराजे यांच्या निर्णयाने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. 

काँग्रेसने आधी राजेश लाटकर यांना उमेदवारी दिली होती. मात्र नगरसेवकांचा विरोध असल्याने ऐनवेळी काँग्रेसने आपला उमेदवार बदलून मधुरिमा राजे यांना उमेदवारी दिली. त्यानंतर राजेश लाटकर यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल करत बंडखोरी केली होती. गेल्या काही दिवसांपासून राजेश लाटकर यांची मनधरणी करण्याचे काँग्रेस नेत्यांचे प्रयत्न सुरू होते. खासदार छत्रपती शाहू, सतेज पाटील यांनी लाटकरांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत होते. मात्र मधुरिमा राजे यांनी शेवटच्या क्षणाला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने कोल्हापुरात महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. 

राजेश लाटकर यांची उमेदवारी जाहीर होताच अज्ञातांनी काँग्रेस कार्यालयावर दगडफेक करत नाराजी व्यक्त केली होती. लाटकरांच्या उमेदवारीला काँग्रेसच्या माजी नगरसेवकांनी विरोध केला होता. यानंतर अवघ्या काही तासांत त्यांची उमेदवारी रद्द करून काँग्रेसकडून मधुरिमाराजे छत्रपती यांना उमेदवारी देण्यात आली होती. यानंतर लाटकर समर्थकांमध्ये नाराजी पसरली होती. नेते मंडळींनी लाटकर यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरीही राजेश लाटकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. आज उमेदवारी माघार घेण्याचा शेवटचा दिवस असताना शेवटच्या १० मिनिटांपूर्वी मधुरिमाराजे यांनी अर्ज मागे घेतला. त्यामुळे काँग्रेसला धक्का बसला.

दरम्यान, रविवारी छत्रपती कुटुंबियांकडून राजेश लाटकर यांची भेट घेऊन त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. यावेळी राजेश लाटकर यांनी षड्यंत्र रचून आपली उमेदवारी रद्द करण्यात आल्याचा थेट आरोप खासदार शाहू छत्रपती यांच्यासमोर केला होता.

Whats_app_banner