मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  “साहेब गद्दारांना क्षमा नाही..”, उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ काँग्रेसची बॅनरबाजी
उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ काँग्रेसची बॅनरबाजी
उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ काँग्रेसची बॅनरबाजी
26 June 2022, 22:05 ISTShrikant Ashok Londhe
  • Share on Twitter
  • Share on FaceBook
26 June 2022, 22:05 IST
  • शिंदे समर्थक आणि ठाकरे समर्थक कार्यकर्त्यांकडून आपआपल्या नेत्यांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी केली जात असतानाच आता अहमदनगर जिल्ह्यात काँग्रेस  कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या समर्थनाचे बॅनर लावले आहेत.

अहमदनगर – एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंड पुकारल्यामुळे  महाआघाडी सरकार संकटात सापडले आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडाने  शिवसेनेत उभी फूट पडल्याचे चित्र आहे. अनेक ठिकाणी शिंदे समर्थक आणि ठाकरे समर्थक कार्यकर्त्यांकडून आपआपल्या नेत्यांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी केली जात असतानाच आता अहमदनगर जिल्ह्यात काँग्रेस  कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या समर्थनाचे बॅनर लावले आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

श्रीरामपूर शहरात काँग्रेसचे माजी नगरसेवक तथा विद्यमान शहराध्यक्ष संजय छल्लारे यांच्याकडून उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ श्रीरामपूर नगरपरिषद   कार्यालयाजवळ हे बॅनर लावण्यात आले. या बॅनरवर ‘साहेब गद्दारांना क्षमा नाही, आय सपोर्ट उद्धव ठाकरे’ असा मजकूर लिहिलेला आहे. भगव्या रंगाच्या या बॅनरवर शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे, काँग्रेसचे माजी आमदार दिवंगत जयंत ससाणे तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह शहराध्यक्ष संजय संजय छल्लारे यांचा गळ्यात भगवे उपरणे घातलेला फोटो या बॅनरवर लावण्यात आला आहे.

सोशल मीडियावर भाजप कार्यकर्ते बंडखोर आमदारांसह एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ पोस्ट करत आहेत. तर आता काँग्रेस-राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ उतरले आहेत. छल्लारे आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी हे बॅनर सोशल मीडियावर देखील व्हायरल केले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत आता घरोबा नको तर नैसर्गिक मित्र असलेल्या भाजपसोबत सत्ता स्थापन करावी, अशी अट घालत एकनाथ शिंदे यांनी बंडाचे हत्यार उपसले आहे.

कडवट शिवसैनिक अशी ओळख असणारे राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदें यांच्यासह सेनेच्या ४० पेक्षा अधिक आमदारांनी बंड पुकारत थेट गुवाहाटी गाठली आहे. या सगळ्या राजकीय घडामोडींमुळे राज्य सरकार अस्थिर झाले आहे. ठाकरे सरकारचे काय होणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. अशातच या बंडखोर आमदारांविरोधात शिवसेनेकडून ठिकठिकाणी निदर्शने तसेच आक्रमक आंदोलनं केली जात आहेत. मात्र आता शिवसेनेसोबत राष्ट्रवादी आणि काँग्रेस कार्यकर्ते देखील उद्धव ठाकरे यांना पाठींबा देण्यासाठी सरसावल्याचं बघायला मिळतंय.