Maharashtra Congress New President: महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. याच पार्श्वभूमीवर अखिल भारतीय काँग्रेस समितीने एक मोठा निर्णय घेतला. नाना पटोले यांना महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदावरून हटवण्यात आले. नाना पटोलेंच्या जागी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या अत्यंत जवळचे हर्षवर्धन सपकाळ यांची वर्णी लागली आहे. याशिवाय, विजय वडेट्टीवार यांची काँग्रेस विधिमंडळ पक्ष नेते म्हणून नियुक्ती करण्यात आली.
अखिल भारतीय काँग्रेस समितीने जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, 'काँग्रेस अध्यक्षांनी हर्षवर्धन सपकाळ यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या अध्यक्षपदी तात्काळ नियुक्ती केली आहे. माजी अध्यक्ष नाना पटोले यांच्या योगदानाचे पक्ष कौतुक करतो. तर, महाराष्ट्रातील काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून विजय नामदेवराव वडेट्टीवार यांची नियुक्ती करण्यात आली.' काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी ही अधिसूचना जारी केली आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर पक्षाकडून घेण्यात आलेला हा पहिलाच निर्णय आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठ्या पराभवाला सामोरे जावा लागले. यानंतर पक्षातील वरिष्ठांनी महाराष्ट्र काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष बदलून मोठा उलटफेर केला. या पदाच्या शर्यतीत माजी मंत्री सतेज पाटील, अमित देशमुख आणि विश्वजीत कदम यांचे नाव चर्चेत होते. मात्र, या तीन बड्या नेत्यांना डावलून काँग्रेसने सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला.
बुलढाण्यातील काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांचा जन्म ३१ ऑगस्ट १९६८ साली झाला. शेतकरी कुटूंबातून आलेले असून सामाजिक कार्य व राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. भारतीय राष्ट्रीय विद्यार्थी संघटनाच्या माध्यमातून राजकीय जीवनात सक्रीय झाले. त्यांनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातून बी.कॉम व बी. पी.एड पदवी धारण केली. शेतीस्वावलंबनासाठी तसेच टंचाईमुक्तीसाठी त्यांनी आपल्या विधानसभा मतदार संघात केलेला जलवर्धन प्रकल्पाच्या माध्यमातून जलव्यवस्थापन तथा जलसंधारण क्षेत्रात त्यांनी विशेष उल्लेखनीय कार्य केले आहे. १९९९ से २००२ या कालावधीत महाराष्ट्रातील सर्वात तरूण जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून त्यांची ओळख आहे. २०१४ ते २०१९ या कालावधीत ते बुलढाणा विधान सभा मतदार संघात विधान सभा सदस्य म्हणून राहिले आहेत. काँग्रेसचे सचिव म्हणून पंजाबचे सहप्रभारी म्हणून सुध्दा काम केले आहे. तसेच तत्पूर्वी गुजरात व मध्यप्रदेश या राज्यांचे सुध्दा सहप्रभारी म्हणून जबाबदारी पार पाडलेली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील आदिवासी तथा आदिवासी गावांचे सक्षमीकरण करण्यासाठी गेल्या २५ वर्षांपासून सातत्याने प्रयत्नशील तथा कटीबध्द आहेत.
संबंधित बातम्या