विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने चौथी उमेदवार यादी जाहीर केली आहे. काँग्रेसनं शंभरच्या वर उमेदवार जाहीर केले आहेत. आतापर्यंत १०२ जागांवर काँग्रेसने उमेदवार जाहीर केले असून कुलाब्याची जागा अखेर काँग्रेसने घेतली आहे.कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसने उमेदवार बदलला आहे. कोल्हापूर उत्तर मधून मालोजीराजे छत्रपती यांच्या पत्नी मधुरीमाराजे छत्रपती यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
काँग्रेसने राजेश लाटकर यांना उमेदवारी दिल्याने पक्षात मोठी नाराजी पसरली होती. अनेक नगरसेवकांनी सजेज पाटील यांना पत्र लिहून लाटकर यांच्या उमेदवारीबाबत पुनर्विचार करण्यात यावा,अशी विनंती केली होती. अखेर काँग्रेस पक्षाने बैठकीत उमेदवार बदलण्याचा निर्णय घेतला. मधुरीमाराजे छत्रपती मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील.
काँग्रेसने आज चार उमेदवारांची घोषणा केली. आता मुंबईतील बोरिवली आणि मुलुंड या दोनच जागा जाहीर होणे बाकी आहे. सोलापूर शहर मध्य मधून अखेर काँग्रेसने उमेदवार घोषित केला असून येथेशहराध्यक्ष चेतन नरोटे यांना उमेदवारी दिली आहे. या जागेवर महाविकास आघाडीतर्फे माकपचे नरसय्या आडम इच्छुक होते. मात्र, आडम यांना संधी न देता चेतन नरोटे यांना उमेदवारी दिली आहे.
अकोला पश्चिम - साजिद खान मन्नन खान
कुलाबा - हीरा देवासी
सोलापूरशहर मध्य - चेतन नरोटे
कोल्हापूर उत्तर - मधुरिमाराजे छत्रपती (राजेश लाटकर यांच्या जागी उमेदवारी)
महाविकास आघाडीच्या जागा वाटपात काँग्रेसच मोठा भाऊ ठरला आहे. काँग्रेसने शंभर जागांचा टप्पा ओलांडला आहे. काँग्रेसनं आतापर्यंत १०२ जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. महाविकास आघाडीतील अन्य दोन मुख्य घटक पक्ष असलेल्या उद्धवठाकरेंच्या शिवसेनेनं ८५ तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने ८२ जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत.
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसने राजेश लाटकर यांना उमेदवारी दिली होती. यामुळे काँग्रेसमधील इच्छुक व निष्ठावंत कार्यकर्ते नाराज झाले होते. लाटकर यांचे नाव जाहीर होताच काँग्रेसमधील निष्ठावंत कार्यकर्ते माजी नगरसेवक आणि कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी पसरली. काँग्रेसच्या कार्यालयावरही दगडफेक झाली. त्यानंतर कोल्हापूरच्या २६ नगरसेवकांनी सतेज पाटील यांना पत्र लिहित उमेदवार बदलण्याची मागणी केली.
घोषित केलेल्या उमेदवारासंदर्भात मोठी नाराजी असल्याने काँग्रेसकडून तातडीने उमेदवार बदलाच्या हालचाली सुरू झाल्या. खासदार शाहू महाराज छत्रपती,काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्यासह इतर नेत्यांची नवीन राजवाडा येथे बैठक पार पडली. त्यानंतर राजेश लाटकर यांच्याऐवजी कोल्हापूर उत्तरमधून मधुरिमाराजे छत्रपती यांना तिकीट देण्याचा निर्णय घेण्यात आला व पक्षश्रेष्ठींना कळवण्यात आले.
संबंधित बातम्या